आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लघुउद्योगाला मिळणार ‘फ्लॅटेड’ बळ, उद्योजकांची प्रलंबित मागणी होणार लवकरच पूर्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - भाड्याच्या इमारतीत लघुउद्योग चालवणार्‍या उद्योजकांना लवकरच स्वमालकीच्या गाळ्यांत उद्योग सुरू करता येणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून शहरातील उद्योजकांनी केलेली गाळ्यांची मागणी फलद्रुप ठरली असून, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून लघुउद्योजकांसाठी अंबड औद्योगिक वसाहतीत फ्लॅटेड बिल्डिंग (गाळे इमारत) साकारली जाणार आहे. पंधरा दिवसांत या इमारतीच्या निविदा काढण्यात येणार असून, अठरा महिन्यांत ही इमारत उभी राहणे अपेक्षित आहे. एमआयडीसीच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे लघुउद्योजकांत मात्र समाधानाचा सूर आहे.

लघुउद्योजकांसाठी ‘एमआयडीसी’ने स्वमालकीचे गाळे उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी महाउद्योग मित्र संघटनेने गेल्या तीन वर्षांपासून लावून धरली होती. त्यांची ही मागणी 2009-10 सालापासून कायम असून, महाउद्योग मित्रच्या नेतृत्वाखाली 148 लघु उद्योजकांनी डिमांड ड्राफ्टद्वारे पैसे भरून अनोखे ‘पैसे भरो’ आंदोलन करत या प्रलंबित मागणीकडे ‘एमआयडीसी’चे लक्ष वेधले होते.

स्थानिक अधिकार्‍यांनीही हा विषय सकारात्मकेतेने घेत एमआयडीसीकडून प्रस्ताव मंजूर करून घेतल्याने अखेर या इमारतीच्या कामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे शहरातील लघु उद्योजकांसाठी उद्योगवृद्धीची संधीच चालून आली आहे. एमआयडीसीने विकासकामात यापुढेही अशीच चुणूक दाखविण्याची अपेक्षा उद्योजकांकडून व्यक्त होत आहे.

लेखी मागणी करणार्‍यांना द्यावे प्राधान्य
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अभियंत्यांचे या सकारात्मक पाऊलासाठी आभार मानायलाच हवे. भाड्याच्या गाळ्यात उद्योग असणार्‍या आणि तीन वर्षांपासून एमआयडीसीत गाळयांची लेखी मागणी करणार्‍या लघु उद्योजकांना प्राधान्य दिले जावे. आमच्या सदस्यांनी आगाऊ नोंदणीची तयारी दर्शविली असून त्यावर निर्णय व्हावा. प्रदीप पेशकार, अध्यक्ष, महाउद्योग मित्र आघाडी, नाशिक

अशी आहे इमारत
सिमेन्स कंपनीसमोर असलेल्या रस्त्याकडेला आणि आयमा हाऊसकडे जाणार्‍या आयटी पार्कमागील भुखंडावर ही फ्लॅटेड बिल्डिंग उभारली जाणार आहे. या तीन मजली इमारतीत एकूण 207 गाळे असतील. त्यांचा आकार 500 चौरस फुटांपासून 1800 चौरस फुटांपर्यंत असेल. त्यामुळे बहुतांश लघु उद्योजकांची मागणी पूर्ण होणार आहे.

अठरा महिन्यांत उभारणी
इमारतीसाठी 35 कोटी रुपयांचा खर्च मंजूर झाला असून, अठरा महिन्यांत ती पूर्ण होणे अपेक्षित आहे. पंधरा दिवसांत या इमारत बांधकामाच्या निविदा काढल्या जातील. एमआयडीसीकडे गाळ्यांची मागणी करणार्‍या उद्योजकांना हे गाळे दिले जातील. लघुउद्योजकांसाठी ही इमारत लाभदायी ठरणार आहे. त्यातूनच लघुउद्योगालाही चालना मिळेल. - जयंत बोरसे, कार्यकारी अभियंता