आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यभरातील स्मार्ट कार्ड कंत्राट संपुष्टात; नव्या ठेकेदाराचा शोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नव्याअथवा जुन्या वाहन खरेदीसाठीचे प्रादेशिक परिवहन विभागात करण्यात येणा-या वाहन नोंदणीचे प्रमाणपत्र (आरसी बुक) स्मार्ट कार्डच्या स्वरूपात मिळणे बंद झाले आहे. त्‍याऐवजी आता वाहनधारकांना जुन्या पद्धतीचे छापील प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. राज्यभरातील परिवहन कार्यालयांमध्ये खासगी तत्त्वावर स्मार्ट कार्डसाठी ‘वाहन’ प्रणाली उपलब्ध करून देणाऱ्या ठेकेदाराचे कंत्राट संपुष्टात आले असून, परिवहन विभागाकडून शासन स्तरावर नव्या कंत्राटदाराचा शोध सुरू आहे.
काही वर्षांपासून परिवहन विभागाने आधुनिकीकरणावर भर देत वाहन चालविण्याचा शिकाऊ परवाना, कायमस्वरूपीचा परवाना(लायसन) वाहन नोंदणी प्रमाणपत्र (आरसी बुक), हस्तांतरण प्रमाणपत्र, करप्रणालीच्या पावत्या या सर्व विभागांचे संगणकीकरण केले आहे. त्यामुळे जुन्या पद्धतीचे पुस्तक अाणि कागदी मिळणारा परवाना इतर प्रमाणपत्र आता छोट्या आणि स्मार्ट कार्डमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. यासाठी परिवहन विभागाने खासगी तत्त्वावर राज्यभरातील परिवहन कार्यालयांमध्ये परवान्यासाठी ‘सारथी’तर नोंदणी प्रमाणपत्रासाठी ‘वाहन’ प्रणाली कार्यान्वित होती. त्यात वाहनधारकांचा सर्व कागदपत्रे स्कॅन होऊन त्याची माहिती स्मार्ट कार्डमध्ये एकत्रित दिली जायची. त्यामुळे गैरप्रकारांना आळा बसून पारदर्शकता आणण्‍यात आली होती.
मुदत संपली
वाहनप्रणालीची सेवा पुरविणाऱ्या कंत्राटदाराची मुदत संपल्याने प्रशासनाकडून आता छापील स्वरूपात नोंदणी प्रमाणपत्र वितरित केले जात आहे. त्यामुळे वाहनधारकांकडून स्मार्ट कार्डसाठी आकारण्यात येणारे ३९४ रुपये शुल्क बंद करण्यात आले आहे. मात्र, हे प्रमाणपत्र पूर्वीप्रमाणेच टपालामार्फतच पाठविण्यात येणार असल्याने त्याचे ५० रुपये शुल्क अदा करण्यात येणार आहे. दरम्यान, परवान्यासाठी स्मार्ट कार्ड नियमितपणे सुरूच राहणार असल्याचे परिवहन अधिका-यांनी सांगितले.