आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्हा वीज उत्पादक; नाशिकमध्ये लवकरच येतेय स्मार्ट ग्रीड तंत्रज्ञान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - नाशिककरांनो, तुम्हाला लागणारी वीज तुम्ही स्वत:च निर्माण करून ती वीज वितरण करणार्‍या ग्रीडला विक्री करू शकता, पाहिजे तेव्हा ती परतही घेऊ शकता, असे अनोखे स्मार्ट ग्रीड तंत्रज्ञान लवकरच येत आहे. नाशिकमध्ये या प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी पुरेपूर वाव असून, त्यासाठीच्या पायाभूत सुविधाही उपलब्ध आहेत.

वीज वितरण केले जाणार्‍या केंद्राला ‘ग्रीड’ म्हणतात. आज औष्णिक, अणू आणि विंड याप्रकारे वीजनिर्मिती होत आहे. पण, ती पुरेशी नाही, हे बहुतांश खेड्यांतून रात्रीचा दाटलेला अंधार पाहता लक्षात येते. यावरच ‘स्मार्ट ग्रीड’ हे नवे तंत्रज्ञान दिलासादायी ठरणार आहे. यातून सध्याच्या वीजग्राहकाला वीज निर्माता आणि विक्रेताही बनता येणार आहे.

कशी देता येईल वीज?
घरगुती सोलर, बायोगॅस, विंड मिल याद्वारे वीजनिर्मिती होत. ही वीज बहुतांश घरांसाठी वापरली जाते. आपली गरज भागून वाचणारी वीज आपण स्मार्ट ग्रीडला विक्री करू शकतो. यासाठी वीज वितरण कंपनीचे इम्पोर्ट-एक्स्पोर्ट मीटर ग्राहकाकडे बसविले जाते. यातून किती वीज दिली आणि किती परत घेतली, हे कळते. आपल्याला हवे तर विक्री केलेल्या विजेपोटी पैसेही मिळतात. राज्यातील बहुतांश साखर कारखाने वीज उत्पादन करू लागले असून, ते अशाच प्रकारे वीज विक्री करतात. तीच पद्धत शहरात वापरली जाणार आहे.

पायाभूत सुविधा उपलब्ध
शहरात आज ज्या-ज्या घरात सोलर वॉटर हिटर आहे, त्याचा वापर केवळ पाणी गरम करण्यासाठीच होतो. पण, याच सोलर पॅनलला काही आणखी प्लेट लावल्या की तुम्ही वीजनिर्मिती करू शकता. तीच वीज स्मार्ट ग्रीडला देऊ शकता. आज शहरात विजेची देवाणघेवाण करण्यासाठी पायाभूत सुविधांची उपलब्धता असल्याने स्मार्ट ग्रीड तंत्रज्ञान साकारण्याचे वेध लागले आहे.

हरित ऊर्जेला प्रोत्साहन
याप्रकारे अपारंपरिक स्त्रोतांतून वीजनिर्मिती होईल. यामुळे सोलर, विंड मिल, बायोगॅस, बगॅस यांतून निर्माण होणार्‍या विजेचे उत्पादन वाढू शकेल. याकरिता ‘मेडा’ या शासकीय संस्थेकडून विविध कर सवलती आणि भरपूर अनुदानेही उपलब्ध आहेत. शहरात ही संकल्पना निश्चित राबविली जाऊ शकते. पी. यू. शिंदे, मुख्य अभियंता, महावितरण

उद्योगांना फायदा
याप्रकारे वीजनिर्मिती करून ती ग्रीडला देण्याची परंपरा नाशिकमध्ये आहे. कारण, इनॉक्सएअर या कंपनीकडून अशी वीज ग्रीडला दिली जात होती. आज ग्राफाईट कंपनीचाही प्लॅँट आहे. उद्योगांना स्मार्ट ग्रीडचा फायदा होणार आहे. कारण दिवसा वीजदर जास्त असतो, तर रात्री दर कमी असतो. याचा मेळ घालून आर्थिक फायद्यासह कर सूट, अनुदान यांचा फायदाही घेता येणार आहे. मनीष कोठारी, उपाध्यक्ष, नाशिक इंडस्ट्रीज मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन