आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मेरी’तील माती परीक्षणाचे यंत्र झाले कालबाह्य

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मेरीतील माती परीक्षण करणार्‍या यंत्रसामग्रीला सुमारे 50 वर्षे झाल्याने ती कुचकामी झाली आहे. वारंवार दुरुस्ती करूनही माती परीक्षणाचे अहवाल वेळेत येत नाहीत. यामुळे हवालदिल झालेल्या शेतकर्‍यांना महागड्या खासगी माती परीक्षण केंद्रात जावे लागत असल्याने आर्थिक झळ बसत आहे. मेरीत नव्या यंत्राची गरज असल्याची शेतकर्‍यांमध्ये चर्चा आहे.
पाण्याच्या अभावामुळे पूर्वीच धोक्यात आलेला शेती व्यवसाय करण्यासाठी शेतकरी माती परीक्षण करून घेत त्या अनुषंगाने पिके घेत अधिक उत्पादनासाठी प्रयत्नशील आहे. बहुतांशी शेतकरी माती परीक्षणासाठी नाशिकच्या मेरी (महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था) येथे येतात. मात्र, येथील परीक्षण करणारी यंत्रणा ही 1964 आणि 1975 ची असून ती कुचकामी झाली आहे. वारंवार दुरुस्ती करून माती परीक्षण करावे लागत आहे. अचूक माती परीक्षणासाठी सुमारे चार ते पाच महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे परवडत नसतानाही खासगी प्रयोगशाळेत जाण्याची वेळ येत असल्याने त्यांना आर्थिक झळ बसत आहे. यात तत्काळ सुधारणा होण्याची गरज निर्माण झाली आहे.
मेरी, सीडीओ आणि मेटा ही प्रमुख कार्यालये नाशिक येथे असल्याने धरणांची सर्व प्राथमिक तपासणी या कार्यालयातून केली जाते. मात्र, येथील बहुतेक यंत्रणा ही पूर्वीची असल्याने काही यंत्रे गंजली आहेत, तर काही निकामी झाली आहेत. त्यामुळे माती परीक्षण करण्यासाठी उशीर होत असल्याने अनेकजण माती परीक्षण करण्यासाठी दुप्पट दर देऊन खासगी माती तपासणी प्रयोगशाळेत जातात. यावर्षी मेरी माती परीक्षण विभागाने जुलै ते ऑक्टोबरपर्यंत 391 नमुने तपासले असून, राज्य शासनातर्फे केवळ 400 नमुन्यांचे उद्दिष्ट दिलेले असते. मात्र, येथे कुचकामी यंत्रणा असूनही कर्मचार्‍यांना काम करावे लागते. याबाबत येथील कर्मचार्‍यांकडे विचारणा केली असता त्यांनी माहिती देण्यास नकार दिला. त्याचप्रमाणे खासगीमध्ये परीक्षणाला खूपच खर्च येत असल्याने मेरीतील यंत्राच्या सध्याच्या स्थितीबाबत बोलण्यास कोणीही तयार नाही.
निधीची प्रतीक्षा
मेरी प्रशासनाने दोन अत्याधुनिक यंत्रांची शासनाकडे मागणी केली आहे. यामध्ये एक यंत्र हे अंदाजे 17 लाख रुपये किमतीचे आहे. दोन्ही मिळून 34 लाख रुपयांच्या निधीच्या प्रतीक्षेत आहे. अत्याधुनिक यंत्रांमध्ये परीक्षणासोबत त्वरित संगणकावरच आकडेवारी येणार असल्याने रिपोर्ट देण्यासाठी उशीर होणार नाही. नवीन अत्याधुनिक यंत्रांसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. त्यासाठी शासनाने पाठिंबाही दिला आहे. नवीन यंत्रे आल्यास परीक्षण तत्काळ होण्यास मदत होईल. प्रकाश भामरे, महासंचालक, मेरी