आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनधिकृत 11 धार्मिक स्थळे हटवली, महापालिकेची आजही मोहीम सुरू राहणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्याची मोहीम महापालिकेने सोमवारपासून सुरू केली. सलगरवस्ती, रामवाडी, पोटफाडी चौक, जगदंबा चौक, पाच्छा पेठ परिसरासह अन्य भागातील ११ धार्मिक स्थळे हटवण्यात आली. पोटफाडी चौकात काहीनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. उद्याही मोहीम सुरू राहील, असे महापालिका बांधकाम परवाना विभागाकडून सांगण्यात आले. 
 
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्यात येत आहेत. नोव्हंेबर रोजी पोलिस आयुक्तालयात बैठक झाली. रविवारपर्यंत स्थळांची पाहणी करून सोमवारी तीन पथके तयार करून पाडकाम मोहीम हाती घेण्यात आली. एका पथकात एक जेसीबी, अभियंता, कर्मचारी यांचा समावेश होता. या पथकाने मनपा झोन क्रमांक ६, ७, मध्ये कारवाई केली. 
 
मनपा झाेन क्रमांक सहामध्ये तीन धार्मिक स्थळे हटवण्यात आली. त्यात सलगरवस्ती, दीक्षित हाॅस्पिटलजवळील देवी मंदिर, महालक्ष्मी मंदिर. झोन क्रमांक सातमध्ये रामवाडी येथील हुसेन बाबा दर्गा, जगदंबा चौकातील जगदंबा मंदिर, दिवेकर बेकरीजवळ लक्ष्मी मंदिर, रेल्वे पोर्टर चाळ येथील मंदिर, नायडू घराजवळील मंदिर यांचा समावेश आहे. झोन क्रमांक आठमधील पोटफाडी चौकातील म्हसोबा मंदिर काढताना काहीनी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी तो हाणून पाडला. ते मंदिर हटवण्यात आले. न्यू पाच्छा पेठेतील अंबाबाई मातंग मंदिर, कुमठा नाका परिसरातील दोन मंदिरे हटवण्यात आली. 
 
महापौरांना निवेदन 
अनधिकृत धार्मिक स्थळांचे सोमवारी पाडकाम करण्यात आले. मंगळवारीही मोहीम सुरू ठेवण्यात येणार आहे. काही धार्मिक स्थळांबाबत नागरिकांनी महापौर शोभा बनशेट्टी यांच्याकडे निवेदन दिले. काही जणांनी नूतनीकरणासाठी महापालिकेकडे अर्ज केले आहेत. 
 
२२२ स्थळांचा निर्णय अद्याप नाही 
११धार्मिक स्थळे हटवली. १९६० पूर्वीचे ११ मंदिरे असून, त्यांचा निर्णय शासनस्तरावर होणार आहे. दमाणीनगर परिसरातील एक मंदिर तेथील भक्तांनी स्वत:हून काढून घेतले. पाच स्थळांची यादी दुबार नोंदीत आल्याचे सांगण्यात आले. २५० पैकी २८ स्थळांचा निर्णय झाला. तर २२२ धार्मिक स्थळांचा निर्णय होणार आहे. अनधिकृत धार्मिक स्थळे १७ नोव्हेंबरअखेर हटवावीत, असा शासन निर्णय आहे. 
 
मोहीम आजही 
अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत पाडकाम मोहीम न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी पाडकाम करण्यात येणार आहे. 
- रामचंद्र पेंटर, मनपा बांधकाम परवाना विभाग प्रमुख 

 
बातम्या आणखी आहेत...