आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सौरऊर्जेने उजळले आमले गाव; आदिवासींना मिळाले शुद्ध पाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- मोखाडा तालुक्यातील अतिदुर्गम डोंगराळ भागात आदिवासी लोकवस्तीचे आमले गाव स्वातंत्र्यपूर्व काळापासून अंधारातच होते. वीज नसल्याने शेतीची, आरोग्याची आणि आर्थिक परिस्थिती खालावलेली. आरोहन संस्थेच्या संचालिका अंजली कानिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्रद्धा शृंगारपुरे यांनी सीमेन्स कंपनीच्या माध्यमातून येथे सौरऊर्जेद्वारे वीज दिली. त्यामुळे गावातील 58 घरांमध्ये दिवे लागले. शेती आणि पिण्यासाठी पाण्याची सोय सौरऊर्जेवर करण्यात आली. सौरप्रकाशाने आमले गावासह आदिवासींचे जीवन उजळले.

आरोहन संस्थेतर्फे आदिवासींच्या कुपोषण निर्मूलनाचे कार्य चालते. त्या वेळी येथील भागात विजेअभावी विकास होत नसल्याचे संस्थेच्या अधिका-यांचे लक्षात आल्यावर त्यांनी प्रथम या गावात विजेसाठी प्रयत्न केले. मात्र, खर्च मोठा असल्याने आर्थिक समस्या भेडसावत होती. या वेळी संस्थेने सीमेन्स कंपनीशी संपर्क साधून त्यांच्याकडून अर्थसाहाय्य मिळवले. आमले गावात 58 घरे असून एकूण 364 लोकसंख्या आहे. सीमेन्स कंपनीने अर्थसाहाय्य दिल्यानंतर गावात 25 पथदिवे, प्रत्येक घरात दोन सीएफएल बल्ब, 20 हजार लिटर पाण्याची जलशुद्धीकरण यंत्रणा तसेच शेतीसाठी दोन हॉर्स पॉवरची मोटर बसवून पाणी असा सौरऊर्जेवर चालणारा प्रकल्प उभारण्यात आला. यासाठी 40 लाख रुपयांचा खर्च आला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून अंधारात आणि दारिद्र्यात चाचपडत असलेल्या आदिवासी समाजाला आरोहन संस्थेने उभारी दिली आहे.