आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पार्किंगच्या समस्येसाठी सुविधांची उपाययोजना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील वाहतुकीचा खोळंबा होण्यास पार्किंगचा अभाव हीच बाब कारणीभूत असल्याचे ‘दिव्य मराठी’ने निदर्शनास आणून दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने पार्किंगच्या समस्येची तीव्रता कमी करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात महापालिकेच्या मोकळ्या भूखंडांचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या भूखंडांमधील जागा पार्किंगसाठी वापरता येईल का, तसेच पे अँड पार्कसाठी कोणती ठिकाणे योग्य आहेत, समावेशक आरक्षणांत (एआर) विकसित इमारतींतील पार्किंगची उपयुक्तता कशी वाढविता येईल, यासाठी महापालिका प्रशासनाने अभ्यास सुरू केला आहे.

शहरातील मध्यवर्ती ठिकाणीच पार्किंगच्या व्यवस्थेचा खेळखंडोबा झालेला दिसतो. त्यामुळे वाहने अस्ताव्यस्त पसरलेले दिसतात. इतकेच नाही तर शहरातून वाहन न्यायचे म्हटले तरी अनेकांना घाम फुटतो. शहरात शिवाजीरोड, शालिमार, सीबीएस, जिल्हाधिकारी कार्यालय, मेहेर, अशोक स्तंभ, रविवार कारंजा, महात्मा गांधी रोड, मेनरोड, दहीपूल, गंगापूर नाका, कॉलेजरोड, कॅनडा कॉर्नर, मालेगाव स्टँड, मखमलाबाद नाका, महामार्ग बसस्थानक, द्वारका सर्कल, त्रिमूर्ती चौक, नाशिकरोड, बिटको पॉइंट या भागांमध्ये पार्किंगअभावी नेहमीच वाहतुकीचा खोळंबा झालेला असतो. आज शहरात कोठेही जायचे असेल तर प्रथमत: वाहन कोठे पार्क करावे, असा प्रश्न पडतो. वास्तविक इमारतीचा बांधकाम आराखडा मंजूर करतानाच त्यात पार्किंगची तरतूद बघितली जाते. या तरतुदी कागदावरच राहतात, प्रत्यक्षात उतरतच नाही. शहरातील बहुतांश व्यावसायिक इमारतींच्या पार्किंगमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे केली आहेत.

काही जुन्या इमारतींनाही पुरेशी पार्किंग नाही. त्यामुळे या इमारतींमध्ये येणारी वाहने रस्त्यावरच उभी राहतात. ही बाब ‘दिव्य मराठी’ने निदर्शनास आणून दिली होती. त्याची दखल घेत पालिका प्रशासनाने नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी पार्किंगच्या पुरेशा सुविधा देण्याची मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून प्रारंभिक पातळीवर महापालिकेच्या मोकळ्या भूखंडांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. तसेच, महापालिकेच्या वेगवेगळ्या मालमत्तेचेही सर्वेक्षण केले जाणार आहे. जसे पंडित कॉलनी येथील महापालिकेच्या विभागीय कार्यालयासमोर नेहमीच वाहनांची गर्दी असते. ही वाहने समोरच असलेल्या लायन्स क्लब हाॅलच्या पटांगणात लावण्याची व्यवस्था करता येईल का, याचा अभ्यास करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी स्टेडियमसारख्या शासकीय जागांवर पार्किंगची व्यवस्था करता येईल का, याचादेखील अभ्यास होणार आहे. शहरात होणार्‍या वाहतुकीच्या खोळंब्यावर ‘दिव्य मराठी’ने २६ जानेवारी २०१५ च्या अंकात ‘उत्तम पार्किंग; विकासाचे मार्किंग’ अशी उपाययोजना सुचविली होती.

एआर खालील पार्किंगची उपयुक्तता वाढविणार
आरक्षित जमिनी ताब्यात घेण्याची पालिकेची क्षमता नसल्याने प्रचलित नियमाप्रमाणे एकूण क्षेत्राच्या २० टक्के जागा पालिकेला विनामूल्य बांधून देण्याची (ऑकोमोडेशन रिझर्व्हेशन) तरतूद आहे. उर्वरित जागेचा वापर जागामालक इतर प्रयोजनार्थ बांधून देऊ शकतो. या नियमाचा गैरफायदा उचलत वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या पार्किंगच्या जागा काही धनदांडग्यांनी ताब्यात घेतल्या आहेत. या ठिकाणी इमारती उभ्या राहिल्या, मात्र ए.आर. अंतर्गत त्या इमारतींच्या तळघरात तयार केलेल्या वाहनतळांचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना होऊ शकला नाही. हे वाहनतळ म्हणजे त्या-त्या इमारत मालकांच्या खासगी जागा बनल्या आहेत. त्यामुळे ए.आर. अंतर्गत वाहनतळ विकासाच्या मूळ हेतूलाच हरताळ फासला गेला आहे. नाशिकमधील चार पार्किंगच्या जागा एआरखाली विकसित केल्या आहेत. परंतु, येथील पार्किंगचा नागरिकांना उपयाेगच हाेताना दिसत नाही. या पार्किंगची उपयुक्तता वाढविण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जाणार आहेत.