आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाघांचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी आता विशेष कॉरिडॉर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - दुर्मिळ होत चाललेल्या वाघांचे अस्तित्व अबाधित राखण्यासाठी मेळघाट ते अनेरडॅम अभयारण्यापर्यंत टायगर कॉरिडॉरच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची आखणी करण्यात आली आहे. वाघांच्या मुक्त संचारावर मुक्ताईनगर, वढोदा वनक्षेत्रात निर्बंध येऊ नयेत, संरक्षित अधिवासामुळे त्यांची संख्या वृद्धिंगत व्हावी, यासाठी वन विभागातर्फे वाघांचा भ्रमणमार्ग (टायगर कॉरिडॉर) निश्चित करण्यात आला आहे. शासनातर्फे लवकरच त्याला मान्यता मिळणार असल्याचेही वन विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले.


मेळघाट ते अनेरडॅम अभयारण्य या क्षेत्रात वाघ असल्याचे पुरावे वन विभागाला मिळाले. त्याबरोबरच मुक्ताईनगर, वढोदा वनक्षेत्रात त्यांच्या मुक्त संचाराचेही पुरावे प्राप्त झाल्याने वाघांसह इतर प्राण्यांच्या मुक्त संचारासाठी मेळघाट ते अनेरडॅम असा 175 किलोमीटर लांबीचा भ्रमणमार्ग निश्चित करण्यात येणार आहे. त्यासाठी वन विभागातर्फे वन संरक्षण, जीवित हानी आणि पशुहानी रोखणे, पर्यावरणपूरक पर्यटनाच्या अभ्यासासाठी समिती गठित करण्यात आली आहे. या भ्रमणमार्गासाठी एकूण 68 कोटी 81 लाख 29 हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आलाआहे. त्यामुळे भविष्यात आरक्षित क्षेत्रात वाघांसह इतर प्राण्याची संख्या वाढण्यास मदत होणार आहे. वन्य, निसर्ग आणि पर्यावरणप्रेमी यांच्यासाठी खूशखबर आहे.


राज्यात मेळघाट आणि अनेरडॅम अभयारण्यात होणारी पशुहानी, माणसांवर होणारे हल्ले, तसेच वाघांचे आढळलेले मृतदेह या अनेक पुराव्यांवरून वनविभागाकडे या भागात वाघ आणि चित्त्यांसह आदी वन्यप्राणी असल्याचे पुरावे मिळाले आहेत. वाघांची संख्या सातत्याने घटती असल्यामुळे वनविभागापुढे अनेक समस्या उभ्या राहिल्या होत्या. त्यांचे अस्तित्व टिकविण्यासाठी वनविभागाने पुढाकार घेऊन सातत्याने मार्गक्रमण करणा-या वन्यप्राण्यांसाठी मेळघाट, बुलढाणा, जळगाव, यावल, वढोदा, मुक्ताईनगर अनेरडॅम या परिसरातील 62 हजार 839 हेक्टर क्षेत्र सुरक्षित भाग म्हणून निश्चित करण्यात आले.


वनविभागाचे 175 किलोमीटर, तर वनेतर 59 किलोमीटर क्षेत्र या भ्रमणमार्गात समाविष्ट आहे. त्याची रुंदी ही वनक्षेत्रात तीन किलोमीटर रुंद, तर वनेतर क्षेत्रात 500 मीटर ते एक किलोमीटरची असेल.


भ्रमणमार्गाची उपयुक्तता : या 175 किलोमीटरच्या भ्रमणमार्गामुळे सतत फिरस्ती करणा-या वाघांना सुरक्षित मार्ग मिळेल. त्यामुळे त्यांचे प्रजननाचे प्रमाण वाढण्यासाठी त्याचा उपयोग होईल. नामशेष होत चाललेल्या वन्यप्राण्यांचेदेखील जतन होण्यास मदत होईल. तसेच पर्यावरण पूरक पर्यटनातून स्थानिकांना रोजगार प्राप्त होणार आहे. जंगल सुरक्षित राहण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.


जळगाव येथील उप वनसंरक्षकांना या वाघांच्या भ्रमणमार्गासाठी (कॅरिडॉर) सूचना देण्यात आल्या आहेत. ते लवकरच शासनाला प्रस्ताव दाखल करतील.’’ अरविंद विसपुते, वनसंरक्षक, वन्यजीव


मेळघाट ते गुजरात सीमेपर्यंत वाघ आणि चित्ता यांचे अस्तित्व असल्याने या भागात हा भ्रमणमार्ग निश्चित करण्यात आला आहे; मात्र त्यात शेतकरी व नागरिकांचे नुकसान होणार नाही, काळजी घेऊ.’’ अनिल मोहन, अपर मुख्य वनसंरक्षक, नागपूर