आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Editorial For Nashik Edition Anniversary

विशेष संपादकीय: वाचकांशी बांधिलकी गुणगंधाचा उत्सव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाचकांच्या भक्कम पाठिंब्याच्या बळावर ‘दिव्य मराठी’ पाचव्या वर्षात आत्मविश्वासाने पदार्पण करीत आहे. इतक्या कमी कालावधीत नव्या वृत्तपत्राने वाचकांच्या मनात पक्की बैठक मारावी, अशी उदाहरणे विरळा. वाचकांनी उदार मनाने ‘दिव्य मराठी’ला आपलेसे केले हे महत्त्वाचे कारण यामागे आहे. ‘दिव्य मराठी’चा संपादकीय विभाग व्यवस्थापन यांना वाचकांच्या या प्रेमाचा कधीही विसर पडणार नाही. वाचकांच्या प्रेमाबरोबरच ‘दिव्य मराठी’ ज्या भास्कर समूहाचा भाग आहे, त्या भास्कर समूहाचा पत्रकारितेकडे पाहण्याचा विशेष दृष्टिकोन, हेही या यशामागचे आणखी एक कारण आहे. भास्कर समूह व्यावसायिक पत्रकारिता करीत असला तरी वाचकांशी बांधिलकी हे या व्यावसायिकतेचे महत्त्वाचे अंग आहे.
केंद्रस्थानी वाचक हा मुख्य उद्देश समोर ठेवून ‘दिव्य मराठी’चा संपादकीय विभाग काम करतो. वाचकांच्या अडचणी सोडविण्यासाठी बातम्यांच्या माध्यमांतून मदत करणे, त्याला आजूबाजूच्या घडामोडींची माहिती देणे हे वृत्तपत्राचे काम असतेच. पण, त्याच्या पुढे जाऊन वाचकांना चाणाक्ष करणे, त्यांची बुद्धिमत्ता सव्यसाची करणे आणि रोजच्या आयुष्यातील लहान-मोठे निर्णय हुशारीने घेण्यासाठी त्याला सक्षम करणे हे वृत्तपत्राचे कर्तव्य असल्याचे ‘दिव्य मराठी’ मानतो. केवळ मनोरंजन फुटकळ बातम्या देणे हे वृत्तपत्राचे काम नाही. सोशल मीडियातून अशा बातम्या मिळतच असतात. वाचकांच्या क्षमता वाढवित नेणे हे वृत्तपत्राचे मुख्य काम आहे. समाजात बदल घडवून आणायचा असेल तर आधी स्वत:पासून सुरुवात करावी लागते. नवे मार्ग दाखवावे लागतात. नवीन शहर विकास आराखडा तसेच प्रस्तावित स्मार्ट सिटीबाबत समस्त नाशिककरांना सजग करत ‘दिव्य मराठी’ने नवा मार्ग दाखविला.
बातम्यांच्या पलीकडे जाऊन विश्लेषण समजून घेण्यास वाचक उत्सुक असतात. हे विश्लेषण नि:पक्षपाती निर्भीड असावे, अशी वाचकाची अपेक्षा असते. ‘दिव्य मराठी’ ते काम चोखपणे करतो हे अनेक राजकीय सामाजिक घटनांवर आम्ही घेतलेल्या भूमिकेतून स्पष्ट झाले आहे. संपादकाचे बुद्धिवैभव दाखविण्यासाठी नव्हे, तर वाचकांच्या समस्या, व्यथा, गरजा समजून घेण्याला प्राधान्य दिले असल्याने नेहमी वाचकांशी संवाद ठेवून ‘दिव्य मराठी’ची आखणी केली जाते. समस्या मांडून तेथेच थांबता समस्यापूर्तीकडे गेले पाहिजे हे लक्षात घेऊन ‘दिव्य मराठी’च्या वृत्तमालिका आखल्या जातात. नायलॉन मांजाविरोधी अभियान, मतदार जागृती अभियान, पर्यावरण जागृती मोहीम, गोदा स्वच्छता उपक्रम ही यातील काही उदाहरणे. अशा रीतीने नवे मार्ग, निर्भीड विश्लेषण, वाचक संवाद आणि सहकार्यातून समस्यापूर्ती या चतु:सूत्रीनुसार ‘दिव्य मराठी’चा संपादकीय विभाग काम करतो. या चार वैशिष्ट्यांबरोबरच अभिमानाने सांगावे असे पाचवे वैशिष्ट्य म्हणजे आठवड्याची सुरुवात ‘नो निगेटिव्ह न्यूज’ने करण्याचा उपक्रम.
‘सुखद सोमवार’ हा वृत्तपत्रसृष्टीतील धाडसी प्रयोग आहे त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेकांनी जाहीरपणे दाद दिली आहे. समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणे हेही वृत्तपत्राचे एक कर्तव्य ठरते, ही नवी जाणीव भास्कर समूहाने वृत्तपत्रसृष्टीला करून दिली आहे. वाईट गोष्टी घडतच असतात. त्यांच्याकडे दुर्लक्ष होता कामा नये तसेच दुर्लक्ष चांगल्या गोष्टीकडेही होऊ नये. आठवड्यातील एक दिवस जरी आपली नजर सकारात्मक गोष्टी पाहू लागली तरी जगण्याचा उत्साह वाढतो. मात्र, यासाठी नजर प्रयत्नपूर्वक बदलावी लागते. ‘दिव्य मराठी’ त्यासाठी मदत करतो. ‘जगी घाण अन् चिखलची सारा, म्हणो कितीही कुणी शहाणा, पदोपदी मज कमळ घालते, गुणगंधाचा नवा उखाणा’ असे सुंदर शब्द आनंदयात्री बोरकर लिहून गेले आहेत. ‘दिव्य मराठी’चा तोच मंत्र आहे. याच मंत्राने वाचकांच्या आयुष्यातही गुणगंध पसरावा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.