आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विशेष व्यक्तीसाठी पाेलिसांची विशेष तत्परता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गंगापूर रोडवर मंगळवारी सकाळी ११ वाजता पोलिस उपआयुक्तांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहनांचा ताफा पाहून सर्वसामान्य नागरिकांना परिसरात घातपात अथवा एखादी दुर्घटना घडली की काय असा भास झाला. काही वेळानंतर चौकशी केली असता विशेष सरकारी वकिलांच्या मातोश्रींचे मंगळसूत्र चोरीस गेल्याने हा फाैजफाटा गाेळा झाल्याचे समजल्याने नागरिक अचंबित झाले.

शहरात साेनसाखळी चाेरीचे सत्र सुरू असताना तेथे अशी तत्परता पाेलिसांकडून दाखविली जात नाही. गृह मंत्रालयात विशेष दबदबा असलेले ‘माेक्का’शी संबंधित कामकाज चालविणाऱ्या या विशेष सरकारी वकिलांसाठी पाेलिसांनी दाखविलेली विशेष तत्परता जर इतर साेनसाखळीच्या चाेरीच्या प्रकरणात दाखविली तर या चाेरीच्या प्रकारांना अाळा बसेल, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू हाेती.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विशेष सरकारी वकिलांच्या माताेश्री अापल्या नातेवाइकांसह गंगापूररोडवरील शहीद चौकातील एका फुड पार्सलच्या दुकानातून परतत असताना गंगापूरकडून भरधाव येणाऱ्या काळ्या दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातील साेन्याचे तोळ्याचे सुमारे ६० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून पोबारा केला. या घटनेनंतर विशेष सरकारी वकिलांनी पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती कळवली. यानंतर काही वेळातच पोलिस उपआयुक्त एन. अंबिका, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, सचिन गोरे, वरिष्ठ निरीक्षक शंकरराव काळे यांच्यासह आणि गुन्हे शाखा तीनच्या युनिटचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौज फाटा जमा झाल्याने सुरवातीला परिसरात घातपात झाल्याचा संशय नागरीकांना आला. मात्र चौकशीनंतर विशेष सरकारी वकिलांच्या मातोश्रीचे मंगळसुत्र चोरी झाल्याने एवढा फाैजफाटा जमल्याचे समजल्याने याबाबत त्यांना अचंबा वाटला. या घटनेची पोलिस यंत्रणेने तात्काळ दखल घेत शहरातील सर्वच रस्त्यांवर नाकाबंदी करुन संशयीत वाहनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र यश आले नाही. या गुन्ह्यात ज्या प्रमाणे पोलिस यंत्रणेने सतर्कता दाखवली अशाच प्रकारे इतर गुन्ह्यांत सतर्कता दाखवल्यास पोलिस यंत्रणेचा वचक वाढेल आणि गुन्ह्यांचे प्रमाण घटण्यास मदत होईल, अशी चर्चा पोलिसांसह नागरीकांमध्ये सुरु होती. दरम्यान, दोन दिवसांत उपनगर येथे दोन आणि पंचवटी येथे एक सोनसाखळी चोरीची घटना घडनुही पोलिसांची गस्त वाढवली जात नसल्याने पोलिस दलाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

रात्री उशिरापर्यंत नाकेबंदी
एरवीसोनसाखळी चोरीचा गुन्हा घडल्यानंतर एक-दोन पोलिस कर्मचारी वगळता वरिष्ठ अधिकारी घटनास्थळाकडे फिरकतही नसल्याचे यापूर्वी घडलेल्या गुन्ह्यांतून निदर्शनास आले आहे. मात्र, विशेस सरकारी वकिलांच्या माताेश्रींचे मंगळसूत्र चाेरीस गेल्याच्या या घटनेनंतर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत शहरात पाेलिसांनी नाकेबंदी केली हाेती.