आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांकडून असहकार : हेल्मेटसक्ती कारवाईचा धडाका, 300 बेशिस्त वाहनचालकांना दंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शहरात वाहतूक शाखा पाेलिसांकडून संयुक्तरीत्या हेल्मेटसक्ती कारवाईचा धडाका सुरू अाहे. - Divya Marathi
शहरात वाहतूक शाखा पाेलिसांकडून संयुक्तरीत्या हेल्मेटसक्ती कारवाईचा धडाका सुरू अाहे.
नाशिक - शहरात हेल्मेट सक्ती कारवाईचा धडाका सुरुच असून शालिमार चाैक, कॉलेजरोड आणि इतर रस्त्यांवर वाहतूक आणि पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्त कारवाई करत सुमारे ३०० वाहनचालकांवर कारवाई केली. मात्र शालिमार येथे वाहनचालकांवर कारवाई सुरू असतांना खात्यातील एक कर्मचारी विनाहेल्मेट आणि ट्रीपल सीट असूनही कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांसह पथकाच्या ही बाब निदर्शनास आल्याने ही कारवाई फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठी अाहे का, असा प्रश्न उपस्थित झाला अाहे. 
 
शहरात वाहतूक विभागाची धडक कारवाई सुरू आहे. बेशिस्त वाहन चालकांकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याने पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी वाहनचालकांना वाहतूक नियमांचे पालन आणि हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले होते. तरीही बहुतांशी वाहन चालकांकडून हेल्मेटवापरले जात नसल्याने दंडात्मक कारवाईचे आदेश दिले. जुलै महिन्यात तब्बल २१ हजार केसमध्ये ५४ लाख रुपयांचा दंड वसुल केला. या कारवाईत सर्वाधिक ३१४४ विनाहेल्मेट चालकांकडून १५ लाख ७२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला होता. अजूनही अनेक दुचाकीचालक हेल्मेट वापर करत नसल्याने धडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. या आदेशानुसार शालिमार येथे वाहतूक पोलिस कारवाई करत असताना दुचाकीवर एक महिला पाेलिस कर्मचारी विनाहेल्मेट आणि चक्क ट्रिपल सीट दुचाकी चालवत असताना पथकाकडून या महिला कर्मचाऱ्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ही बाब काही नागरिकांच्या निदर्शनास आली. पोलिसांच्या कारवाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असून पाेलिस खात्यातील कर्मचाऱ्यांना मात्र यातून सूट असल्याचे जाणवत होते. 
 
चालकांना भुर्दंड आणि ठेकेदाराचे पोषण 
पाेलिसांकडून हेल्मेट सक्ती कारवाई अजब पद्धतीने सुरू अाहे. हेल्मेट नसलेल्या वाहनचालकांना दंड केल्यानंतर दंड भरण्यास असमर्थ असलेल्या चालकाचे वाहन थेट टेम्पोमधून नेत शरणपूरराेड येथील वाहतूक विभागाच्या कार्यालयात ठेवले जाते. येथे दंडाचे पाचशे रुपये आणि टोईंगचे ७० रुपये असा ५७० रुपयांचा भुर्दंड चालकाला पडतो. हेल्मेटसक्ती कारवाई स्वागतार्ह असली तरी वाहतूक विभागाकडून टोईंग ठेकेदाराला पोसण्याचे काम सुरू असल्याने या कारवाईबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. 
 
पोलिसांकडून असहकार
कारवाई केल्यानंतर वाहतूक पोलिस चालकांशी सौजन्याने वागत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. टोईंग वाहनावरील कर्मचाऱ्याकडून असहकार केला जाताे. टोईंग वाहनावरील ठेकेदाराचे कर्मचारी चालकांशी वाद घालत अरेरावी करतात. वेळप्रसंगी दमदाटी केली जाते. टोईंग वाहन वास्तविक नो पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या दुचाकी उचलण्यासाठी आहे. मात्र वाहतूक पोलिसांकडून हेल्मेट नसलेल्या वाहन चालकांची वाहने टेम्पाेत टाकून ठेकेदाराला पोसण्याचे काम केले जात असल्याने पोलिसांच्या विरोधात रोष वाढत आहे. याकडे पोलिस आयुक्त लक्ष देणार का, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला अाहे. 
बातम्या आणखी आहेत...