आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Special Tax On Flex Board Cut, Mayor Administration Order

फलकावरील विशेष करात होणार घट, महापौरांचा प्रशासनाला आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - एकापेक्षा अधिक फलक लावणार्‍या दुकानदारांवर लादलेल्या विशेष करात शिथिलता आणण्याचा आदेश महापौरांनी प्रशासनाला दिला असून, ठरवलेल्या दरापेक्षाही हा कर कमी करण्याची सूचना केली आहे. मात्र, संपूर्ण करच रद्द करण्याची मागणी संबंधित व्यापार्‍यांनी केली आहे.


महासभेत बुधवारी ‘बाह्य जाहिरात व आकाशचिन्ह धोरणा’स मंजुरी देण्यात आली. या धोरणानुसार एकापेक्षा अधिक फलक लावणार्‍या दुकानदारांना अतिरिक्त कर भरावा लागणार आहे. 2.5 चौरस मीटरपर्यंतच्या फलकासाठी 63 रुपये, तर त्यापेक्षा मोठय़ा आकाराच्या फलकासाठी 125 रुपये प्रतिमहिना असे दर महासभेत ठरवण्यात आले होते. आणखी एका कराचा बोजा टाकणे अन्यायकारक असल्याचे दुकानदारांचे म्हणणे आहे. मूल्यवर्धित कर, व्यावसायिक कर, एलबीटी, आयकर, व्यावसायिक दराने घरपट्टी यासारखे अनेक कर व्यापार्‍यांना भरावे लागत असल्याने फलकावरील कर तातडीने रद्द करावा; अन्यथा आंदोलन केले जाईल, अशी भूमिका व्यापार्‍यांनी घेतली आहे.


‘जाहिरातदार’चे निवेदन : जाहिरात करवाढ सर्वांना परवडेल अशी करावी, अशा आशयाचे निवेदन नाशिक आउटडोअर अँडव्हर्टायझिंग वेल्फेअर असोसिएशनने महापौर अँड. यतिन वाघ यांना मंगळवारी दिले. या करवाढीमुळे संबंधितांच्या व्यवसायावर परिणाम होणार असल्याचेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर महेंद्र गायकवाड, विक्रम कदम, रवी शिरसाठ, इम्तियास अत्तर, गौरव माटे, मन्सूर खान, सचिन गिते आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.


दरात घट करण्याऐवजी पूर्ण करच रद्द करा
व्यापार्‍यांना अनेक कर भरावे लागत असल्याने महापालिकेने फलकांवरील कर तातडीने रद्द करावा. कराच्या दरात घट करून हा विषय संपणार नाही. प्रफुल्ल संचेती, उपाध्यक्ष, नाशिक घाऊक व्यापारी संघटना