आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुनाच्या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी स्वतंत्र पथक

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पोलिस आयुक्तालय हद्दीतील खुनाच्या गुन्ह्यांचा छडा लावून त्यातील आरोपींच्या कठोर शिक्षेसाठी स्वतंत्र पथक पोलिस महासंचालकांच्या आदेशान्वये तातडीने कार्यान्वित करण्यात आले आहे. आरोपीच्या अटकेपासून ते न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची संपूर्ण प्रक्रिया या पथकाकडून राबविली जाईल. तसेच, महिला अत्याचाराच्या गंभीर गुन्ह्यांच्या तपासासाठीदेखील स्वतंत्र महिला पोलिसांचेच पथक नियुक्त करण्यात आले आहे.

खून, दरोडे, लूटमार, सोनसाखळी चोरीच्या तपासासाठी प्रत्येक पोलिस ठाण्यात गुन्हे शोध पथक आहे. मात्र, नियमित कामकाज, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचा बंदोबस्त, आंदोलने यासाठी बराच वेळ खर्ची पडत असल्याने त्यांना मूळ कामास वेळ मिळत नव्हता. त्यामुळे पोलिस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे तीन युनिट स्थापन करण्यात आले असून, त्यांच्यामार्फत गंभीर गुन्ह्यांचा छडा लावला जातो. परंतु, खुनाच्या वाढत्या घटनांचा छडा लागून आरोपींच्या कठोर शिक्षेसाठी आता पोलिस आयुक्तालयात स्वतंत्र पोलिस पथक नियुक्त करण्यात आले आहे.

पथकामार्फतच दोषारोपपत्र - गुन्हे शाखा पोलिस उपायुक्तांच्या नियंत्रणाखाली सहायक आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहायक निरीक्षक व चार कर्मचारी असे सहा जणांचा पथकात समावेश राहील. आयुक्तालयात कुठल्याही ठिकाणी खुनाची घटना घडल्यास हे पथक तातडीने घटनास्थळी दाखल होऊन तपासाची सूत्रे हाती घेतील. खुनाचा गुन्हा संबंधित पोलिस ठाण्यातच दाखल होऊन या पथकामार्फत आरोपींचा शोध घेऊन तपास केला जाईल. केवळ संशयितांच्या अटकेपुरते पथक काम करणार नसून, संशयितांविरुद्ध सबळ पुराव्यानिशी मुदतीत दोषारोपपत्र दाखल करण्याची जबाबदारी पार पाडेल. सुनावणीच्यावेळी तपासातील त्रुटींचा फायदा घेत आरोपी निदरेष सुटणार नाहीत, यासाठी पथक प्रयत्न करेल. साक्षीदारांचे जबाब नोंदवून सरकारी वकिलांच्या संपर्कात पथक राहील.

महिला पथकच करणार तपास - बलात्कार, अल्पवयीन मुलींचे अपहरण, फूस लावून पळवून नेल्याच्या गंभीर गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी स्वतंत्र महिला पथक राहील. हे पथक गुन्हे शाखा उपायुक्तांच्या नियंत्रणाखाली काम करेल. यात निरीक्षक, सहायक निरीक्षक व चार कर्मचारी राहतील.

दोन वर्षांतील गुन्हे - 2011 मध्ये 35 खुनाचे गुन्हे दाखल होऊन त्यात 33 गुन्ह्यांत आरोपींना अटक करण्यात आले होते. 2012 मध्ये 32 गुन्हे दाखल होऊन त्यातील 30 गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले.