आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सहज-सुंदर आयुष्य स्वप्न, हास्यातूनच शक्य’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- ‘स्वप्न बघणं आणि हसणं, हा माणसाचा विशेष अधिकार असूनही केवळ दु:ख कुरवाळण्याच्या नादात तो आपला अधिकारच विसरला आहे’, असे प्रतिपादन विद्यावाचस्पती विवेक घळसासी यांनी केले. स्वप्न आणि हसण्याशिवाय सहजसुंदर आयुष्य अशक्य आहे, हा जीवनमंत्रही त्यांनी दिला.

ग्रामोदय संस्थेतर्फे गंगापूर रोडवरील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित पोपटराव हिरे स्मृती व्याख्यानात ‘स्वप्न बघा, स्वप्न जगा’ या विषयावर ते बोलत होते.

या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की, ‘मनाचे प्रतिबिंब स्वप्न असून ते पाहण्यासदेखील माणूस घाबरतो. त्यामुळे त्याला ध्येयाची अनूभुती घेता येत नाही. स्वप्न टाळणं म्हणजे मन मारण्यासारखंच आहे. स्वप्नाचं अवकाश अर्मयाद आहे. त्याचं साम्राज्य आपल्याला मनासारखे घडविण्याची ताकद ठेवते’, असेही त्यांनी नमूद केले.

‘स्वप्नं आपल्याला मनाशी जोडतात. त्यातूनच आपला आपल्याशी परिचय होतो. पुढे अंतर्मनातील क्षमतांची जाणीव होते. या स्वप्नांची आपण छाननी करण्याची गरज आहे. कारण त्यानंतर आपण या स्वप्नांचा प्राधान्यक्रम ठरवतो. ती स्वप्नं डोळ्यांसमोर उभी राहतात. स्वप्न ध्यास बनून आपल्याला अस्वस्थ करतात, असेही त्यांनी सांगितले.

मनाचं नियोजन, अनुशासन, सातत्य यातून स्वप्न प्रत्यक्षात उतरतं. या सर्व प्रक्रियेदरम्यान जी सिद्धता आपल्यात निर्माण होते, त्यातून सार्मथ्य व अंतिम टप्प्यात सर्मपणाची भावना येते. संत-महात्मे व राष्ट्रपुरुषांनी याच सर्मपणाच्या भावनेतून समाजाला मोठं करण्यासाठी वाहून घेतलं’, असे सांगताना विद्यावाचस्पती घळसासी यांनी माजी राष्ट्रपती तथा ज्येष्ठ शास्त्रज्ञ अब्दुल कलाम यांच्या ‘स्वप्न ते नाही की, जे झोपेत पडतात. स्वप्न ते की जे झोपच लागू देत नाही’ या वाक्यातून स्वप्नांचे महत्त्व पटवून दिले.

स्वप्न बघताना अपराधी भावना ठेवू नका. कारण याच माध्यमातून स्वत:मधील क्षमतांची जाणीव होत असते. जगण्याचा पुरेपूर आनंद घेण्यासाठी माणसाने स्वप्ने बघितलीच पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला.

व्याख्यानाप्रसंगी महापौर अँड. यतिन वाघ, उपमहापौर सतीश कुलकर्णी, मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार, लक्ष्मण सावजी, सुरेश पाटील, विजय साने, कृष्णराव नेरे, नगरसेविका सीमा हिरे, महेश हिरे यांच्यासह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

साध्याची पहिली पायरी
आयुष्यात कुठलीही गोष्ट ही जर साध्य असेल, तर त्याची पहिली पायरी स्वप्नापासून सुरू होते. त्यातूनच पुढे हे साध्य प्रत्यक्षात येते. काही स्वप्न ही डोळसपणे पाहिली जातात, तर काही मानसिक पातळीवर उमटत असतात. हेच विचार अर्धजागृत मनाच्या पटलावर स्वप्नांतून अवतरतात. त्यामुळे स्वप्न हे साध्याची पहिली पायरी आहेत, असेही त्यांनी सांगितले.