आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशकात साकारणार क्रीडाविषयक ग्रंथालय; 11 ऑगस्टला होणार ग्रंथतुला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिकचे ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि. वि. तथा बाळ करमरकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त होणार्‍या सोहळ्यात त्यांच्या वजनाइतकी ग्रंथतुला करण्यात येणार असून, त्या सर्व क्रीडाविषयक पुस्तकांची लायब्ररी छत्रपती शिवाजी स्टेडियममध्येच उभारण्यात येणार आहे. अशाप्रकारे क्रीडाविषयक ग्रंथालयाचा अनोखा उपक्रम राबविण्यात येणार आहे. नाशिकमध्ये बालपणापासूनचा काही कालावधी गेल्यानंतर मुंबईत अनेक नामांकित दैनिकांमध्ये क्रीडा पत्रकार म्हणून कारकीर्द गाजविलेल्या करमरकर यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त 11 ऑगस्टला ग्रंथतुला करण्याचा निर्णय ‘मिळून सारे’ या सर्व क्रीडा संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला. 11 ऑगस्टला सायंकाळी 5.30 वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृहात होणार्‍या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून राज्य कबड्डी संघाचे माजी कर्णधार शांताराम जाधव, महाराष्ट्राचे पहिले ग्रँडमास्टर प्रवीण ठिपसे तसेच आयबीएन लोकमतचे प्रमुख संपादक निखिल वागळे उपस्थित राहणार आहेत. नाशिककर म्हणून महापौर अँड. यतिन वाघ आणि वनाधिपती विनायकदादा पाटील हे मनोगत व्यक्त करणार आहेत.

रंगणार प्रकट मुलाखत
ज्येष्ठ क्रीडा समीक्षक चंद्रशेखर संत आणि क्रीडा संघटक भास्कर सावंत हे करमरकर यांची मुलाखत घेणार असून, या मुलाखतीद्वारे करमरकर यांच्या जीवनातील विविध पैलूंवर प्रकाश टाकला जाणार आहे. तसेच, विविध क्रीडा संघटना आणि संस्थांच्या वतीने करमरकर यांना सन्मानपत्र प्रदान करून सत्कार करण्यात येणार आहे.

क्रीडाप्रेमींसाठी ठरणार पर्वणी
या ग्रंथतुलेमध्ये क्रीडाविषयक विविध प्रकारची पुस्तकेच अंतभरूत करण्यात येणार आहेत. त्यामुळे यानिमित्ताने नाशकात क्रीडाविषयक पुस्तकांचे वाचनालयच सुरू केले जाणार आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी संजय सबनीस यांनी अशा पुस्तकांची लायब्ररी तयार होणार असल्यास तिला छत्रपती शिवाजी स्टेडियमवरच जागा देणार आहे. प्रथमच अशा प्रकारची पुस्तके एका वाचनालयात उपलब्ध होणार असल्याने क्रीडाप्रेमींसाठीदेखील ती एक पर्वणीच ठरेल.