आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहावीचा इंग्रजीचा पेपर आता अधिक वस्तुनिष्ठ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - बदललेल्या अभ्यासक्रमानुसार दहावीच्या इंग्रजीच्या प्रश्नपत्रिकेच्या स्वरूपात मूलभूत बदल करण्यात आले आहेत. मार्च 2014 च्या परीक्षेपासून हे बदल अंमलात आणले जाणार असून, नव्या प्रश्नपत्रिकेत वस्तुनिष्ठ प्रश्नांवर अधिकाधिक भर दिला जाणार आहे.

विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष क्रियेतून विषयाचे आकलन होण्यासाठी अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकांवर भर देण्यात आला आहे. पूर्वी उतार्‍यावरून प्रश्न विचारले जात. त्याऐवजी येत्या परीक्षेत कृतिशील प्रश्न.. जसे वाक्य पूर्ण करा, योग्य शब्द निवडा, जोड्या लावा, चूक की बरोबर ओळखा, अशा प्रश्नांवर भर राहील. प्रश्नपत्रिकेच्या गुण पद्धतीत मात्र बदल झालेला नाही. प्रश्नपत्रिका 80 गुणांची असून, तोंडी परीक्षा 20 गुणांची राहील. व्याकरणाच्या प्रश्नांमधील बदल विद्यार्थ्यांची कसोटी घेतील, असे मत शिक्षकांनी व्यक्त केले आहे.

या प्रश्नांमध्ये वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यांवरून विद्यार्थ्यांना पत्र लिहावे लागणार आहे, तसेच जाहिरातींवरून वर्णन तसेच वृत्तांत लिहिण्याचा प्रश्नही नव्या प्रश्नपत्रिकेत असेल. नवे बदल विद्यार्थ्यांच्या अंगवळणी पडावेत, त्यांना प्रश्नपत्रिका सोडविताना अडचणी येऊ नयेत म्हणून शिक्षकांना प्रशिक्षण तसेच शिक्षण संक्रमण मासिकातून वेळोवेळी सूचना देण्यात येत आहेत.

असे असतील बदल
> पूर्वीच्या तुलनेत अधिक वस्तुनिष्ठ प्रश्न.
> व्याकरणाच्या प्रश्नांमध्ये बदल.
> प्रश्नोत्तरांऐवजी मूलभूत आकलनावर भर.
> जोड्या लावा, वाक्य पूर्ण करा या प्रश्नांचा समावेश.
> क्वेश्चन टॅगऐवजी टेल टॅग आणि इ-टाइप क्वेश्चनऐवजी माय रिस्पॉन्ससारखे बदल.

लवकर अवलंब झाल्यास फायदा
प्रश्नपत्रिका नव्या अभ्यासक्रमानुसार बदलण्यात आल्या आहेत. त्यातील बदलांचा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर अवलंब केल्यास ते नव्या स्वरूपाशी परिचित होतील. या स्वरूपाबद्दल संपूर्ण माहिती ‘शिक्षण संक्रमण’च्या गेल्या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. शिक्षकांनी त्याचे बारकाईने वाचन करणे गरजेचे आहे. मोहन देसले, विभागीय सहसचिव, माध्यमिक व उच्च् माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक

आकलन वाढवावे लागेल
वस्तुनिष्ठ प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळविण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांनी ‘रायटिंग स्किल’च्या प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे. प्रश्नपत्रिकेत वृत्तपत्रातील जाहिराती व बातम्यांशी संबंधित काही प्रश्न असल्याने विद्यार्थ्यांना आकलन वाढवावे लागेल. चंद्रशेखर वाड, सेवानिवृत्त मुख्याध्यापक, पेठे विद्यालय