आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षणात खंड, तरीही बिकट परिस्थितीवर मात करून गाठले यश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. लहान वयातच आईचे छत्र हरपल्याने घरच्या कामाची जबाबदारी अंगावर आली. परिणामी सातवीलाच शिक्षण सोडावे लागले. मात्र, शिकण्याची जिद्द कायमच असल्याने बहि:स्थ विद्यार्थी म्हणून अर्थात १७ क्रमांकाचा अर्ज भरून रिंकू थापा या विद्यार्थिनीने दहावीत ६२ टक्क्यांपर्यंत मजल मारली. सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे रिंकूची मातृभाषा नेपाळी असून, दिवसभर ती हिंदीतून संवाद साधते. तरीही तिने मराठी माध्यमातून परीक्षा देत भाषेचा अडसर शैक्षणिक यशामध्ये येऊ दिला नाही.

दहावीचा टप्पा पूर्ण करण्याची जिद्द मनात बाळगलेल्या रिंकूने जनता विद्यालयातून बहि:स्थ विद्यार्थिनी म्हणून यंदा दहावीची परीक्षा दिली. सातवीनंतर २०१२ मध्ये तिला आपले शिक्षण सोडावे लागले होते. तिचे वडील वॉचमनचे, तर भाऊ हॉटेलमध्ये काम करताे. अर्थार्जनासाठी रिंकूने ब्यूटिपार्लरचे प्रशिक्षण घेतले. मात्र, तिच्यातील कौशल्य आणि शिकण्याची जिद्द बघून तिच्या सहकार्‍यांनी तिला शिक्षण पूर्ण करण्याचा सल्ला दिला. त्याच वेळी तिची शिक्षिका श्रद्धा जगताप यांच्याशी ओळख झाली. त्यांनीही रिंकूला शिकविण्याचे आव्हान स्वीकारत तिला धडे दिले. भाषेची शिक्षणात पडलेला खंड आदी अडचणी पार पाडत तिने दहावीची परीक्षा पहिल्याच प्रयत्नात ६२ टक्के मिळवून यशाला गवसणी घातली.

करा मदतीचा हात पुढे...
बिकट आर्थिक परिस्थिती असतानाही रिंकू थापा हिने दहावीच्या परीक्षेत देदीप्यमान यश मिळविले. आता ितचा पुढील शिक्षणाचा मार्ग मात्र खडतर आहे. या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदतीची नितांत गरज आहे. दानशूरांनी मदतीसाठी रिंकू थापा हिच्या शिक्षिका श्रद्धा जगताप यांच्याशी ९५७९२१२५१२ या क्रमांकावर संपर्क साधावा.