आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाशिकमध्ये मनसे एसटी कामगार सेनेच्या सदस्यात हाणामारी; प्रवाशांचा खोळंबा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- महाराष्ट्र नवनिर्माण एसटी कामगार सेनेच्या दोघा वाहनचालकांमध्ये जुन्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाल्याने दोघांना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करावे लागले. यामुळे दोघा चालकांच्या सकाळच्या सत्रातील फेर्‍या रद्द कराव्या लागल्याने प्रवाशांची गैरसोय झाली. गुरुवारी सकाळी 8.45 वाजेच्या सुमारास नाशिकरोड बसस्थानकाच्या आवारात हा प्रकार घडला.

पंधरा दिवसांपूर्वी चिंधू महादू सानप (43, रा. गुळवंच, सिन्नर) व राजेश पांडुरंग पाटील (42, रा. भोर मळा, सिन्नर फाटा) यांच्यात महाराष्ट्र एसटी को- ऑप. बँकेच्या सभेत सूचना मांडण्यावरून तात्त्विक वाद झाला होता. गुरुवारी सकाळी जुन्या कारणावरून नाशिकरोड बसस्थानकाच्या आवारात जोरदार खडाजंगी झाली. वाद वाढत जाऊन दोघांसह त्यांचे सर्मथक एकमेकांना भिडल्याने तुफान हाणामारी झाली. यात पोटात व छातीत मार लागल्याने पाटील यांना बिटको, तर सानप यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले.

नोकरदार व विद्यार्थी यांना सकाळी कार्यालय व शाळा-महाविद्यालयात जाण्याची घाई असताना, वाहनचालकांच्या आपसातील वादाचा त्रास त्यांना सहन करावा लागला. हाणामारी सुरू असताना असंख्य प्रवासी आपल्याकडे बघत असल्याचेही भान या दोघांना राहिले नाही. जखमी झालेल्या या दोघांची रवानगी रुग्णालयात झाल्याने सानप यांची सकाळची नाशिकरोड ते म्हाडा व पाटील यांची नाशिकरोड ते एचएएल ही बसफेरी रद्द करण्यात आली. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांत उशिरापर्यंत गुन्हा दाखल नव्हता. चिंधू सानप यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली असता, त्यांनी असा प्रकार घडल्याची कबुली दिली.