आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बार्न्स स्कूलसमाेर कर्मचाऱ्याची आत्महत्या कामावरून काढल्याने झाली हाेती उपासमार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - उत्कृष्ट शिक्षणासाठी देश-परदेशात बोलबाला असलेल्या देवळाली कॅम्पमधील अत्यंत प्रतिष्ठित अशा बार्न्स स्कूलच्या एका कर्मचाऱ्याने कामावरून काढल्यामुळे उपासमार हाेत असल्याने शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (दि. २१) घडली. कर्मचाऱ्यांच्या उपासमारीस जबाबदार मानले जाणारे शाळेचे प्राचार्य ज्यूलियन लुक यांना याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतले अाहे. या घटनेने कर्मचाऱ्यांसह परिसरात संताप, असंताेष अाणि तणावाचे वातावरण निर्माण झाले अाहे.
अात्महत्या करणारे चिनप्पा धर्मा मंद्री (वय ५४) हे शाळेत स्वयंपाकी म्हणून काम करीत हाेते. अन्य २९ कर्मचाऱ्यांसह सेवामुक्त करण्यात अालेले मंद्री गेल्या काही दिवसांपासून तणावाखाली वावरत हाेते. उपजीविकेसाठी नाेकरीव्यतिरिक्त दुसरे साधन नसल्याने त्यांना दक्षिण भारतात गावाकडे राहणाऱ्या पत्नी मुलीला पैसे पाठवणेही शक्य हाेत नव्हते. त्यांचीही उपासमार हाेत हाेती. त्यांना कामावर घेण्यासाठी इतर कर्मचाऱ्यांनी लुक यांच्याकडे विनंती केली होती. मात्र, त्यांनी नकार दिल्याने नैराश्यापोटी मंद्री यांनी आत्महत्या केल्याची नोंद पाेलिसांत करण्यात आली आहे. शाळेतील कर्मचारी रमेश देशमुख यांनी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
या शाळेमध्ये वीस-पंचवीस वर्षांपासून काही कर्मचारी करार तत्त्वावर काम करीत होते. दर तीन वर्षांनी वेतनवाढीचा करार हाेत असल्याने त्यातील काही कर्मचाऱ्यांचे वेतन १५ हजार रुपयांपर्यंत गेले होते. मात्र, या वेतनवाढीला विरोध करीत लुकने चार हजार रुपयांनी वेतन कमी करून त्याची गेल्या तीन वर्षांपासूनची वसुली सुरू केली होती. त्याच्या निषेधार्थ ९४ कर्मचाऱ्यांनी रीतसर नोटीस देऊन मध्यंतरी एक दिवस संपही केला होता. परंतु, त्यालाही दाद देता लुक यांनी मनमानी कायम ठेवल्याचे बाेलले जाते. त्यानंतर पुन्हा नोटीस देऊन मार्च २०१६ पासून सर्व कर्मचारी संपावर गेले.

त्यानंतर प्राचार्य लुक यांनी कोणतीही पूर्वसूचना देता या कर्मचाऱ्यांच्या जागेवर नवीन कर्मचाऱ्यांची भरती केली. याबाबत अनेकदा तोडगा काढण्यासाठी प्राचार्य प्रशासनाकडे विनंती करूनही दाद दिल्याने हे प्रकरण कामगार आयुक्तांकडे गेले. त्यांच्या सूचनेनुसार कर्मचाऱ्यांनी आॅगस्टमध्ये संप मागे घेत जुन्या वेतनावर काम करण्याचे मान्य केले. शाळा व्यवस्थापनाने मात्र कर्मचाऱ्यांची विनंती धुडकावत त्यातील २९ कामगारांना सेवामुक्त केले. त्यांच्यात मृत मंद्री यांचा समावेश होता.

बुधवारी सकाळी या घटनेने परिसरात तणाव निर्माण झाला हाेता. काही संतप्त नागरिकांनी तेथील दुचाकी पाडून देत नासधूस केली. तसेच, शाळा प्रशासन आणि प्राचार्यांना शिवीगाळ केली जात होती. या प्रकाराने दिवसभर शाळेला सुटी देण्यात अाली हाेती. खासदार हेमंत गोडसे, पोलिस उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहायक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर, पोलिस निरीक्षक विनायक लोकरे, संजय देशमुख, अशोक भगत यांनी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागविला होता. एकूणच वातावरण पाहून व्यवस्थापनाने शाळा चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला अाहे.
राज्य देशातील नामवंत कलाकार, नेते, उद्योजकांसह बड्या मंडळींचे पाल्य शिक्षण घेत असल्याने बार्न्स स्कूलची चर्चा सर्वत्र अाहे. मात्र, जेव्हापासून ज्युलियन लुक यांनी प्राचार्यपदाचा कार्यभार हाती घेतला तेव्हापासून कर्मचारी आणि शाळा प्रशासनात वारंवार खटके उडू लागले. त्याची परिणती एका कर्मचाऱ्याच्या मृत्यूत झाली.
लुक यांनी केले जगणे मुश्कील
^मी तीसवर्षांपासून या शाळेमध्ये नोकरी करीत आहे. लुक यांच्यापूर्वी असलेल्या प्राचार्यांनी कधीही त्रास दिला नाही. मात्र, लुक यांनी सर्व कर्मचाऱ्यांना जीवन जगणे मुश्कील केले आहे. - सरबती टाक, कर्मचारी
पती बेकार झाल्याने खाण्याचेही हाल
^माझे पती या शाळेत कर्मचारी असून, प्राचार्य लुक आल्यापासून सर्व कर्मचाऱ्यांचा सूड घेत असल्या-सारखे वागत आहेत. पती बेकार झाल्याने आर्थिक परिस्थिती बिघडली असून, राेजच्या खाण्याचेही हाल झाले आहेत. लुकमुळेच मंद्रीने आत्महत्या केली. -शीतल गायकवाड, कर्मचारी पत्नी
खासदार गाेडसे यांचा संयम सुटताे तेव्हा...
गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू असलेल्या बार्न्स स्कूलच्या एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना समजताच खासदार हेमंत गोडसे तातडीने शाळेत अाले. गाेडसे यांनीच यापूर्वी या कर्मचाऱ्याची समस्या सोडविण्यासाठी लुक यांच्यासोबत चर्चा केली होती. त्यावेळी लुक यांनी त्यांना ‘कामावर घेतो’ असे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांना कामावर घेता कायमचे काढून टाकले. लुक यांच्या धाेरणाने संतापलेल्या गाेडसे यांनी त्यांना फोन केल्यानंतरही प्रतिसाद दिला नाही. ते लपून बसले. त्यांना बाहेर खेचत अाणताना गोडसे यांनी संतापात लुक यांच्या कानशिलात लगावली.
चिनप्पा मंद्री
बार्न्स स्कूलसमाेर कर्मचाऱ्याची आत्महत्या कामावरून काढल्याने झाली हाेती उपासमार
लुक अाल्यापासून उडताहेत व्यवस्थापन-कर्मचाऱ्यांत खटके
बातम्या आणखी आहेत...