आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

100 चा स्टॅम्प 250 रुपयांत!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रासायनिक खतांबरोबर द्रवरूप खते घेण्याची सक्ती, गॅसचे कनेक्शन घ्यायचे असेल तर चहा पावडर, धान्य खरेदीची अट असे नानाविध फंडे वापरून ग्राहकांना गंडे घालण्याचे प्रकार ताजे असतानाच आता सरकारी कामांसाठी लागणार्‍या प्रतिज्ञापत्राबाबतही असेच काहीसे घडत असल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री बसत आहे. टायपिंगसह प्रतिज्ञापत्र तयार करून घेणार नसाल तर मुद्रांकच मिळणार नाही, अशी सक्ती काही विक्रेते करीत असल्यामुळे नागरिकांची खुलेआम लूटमार होत आहे. दुसरीकडे, तक्रार आली तर केवळ नोटीस बजावण्याएवढीच कारवाई मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालय करीत असल्यामुळे ग्राहकांनी दाद मागायची तरी कोठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील मुद्रांक विक्रेत्यांच्या या अडवणुकीवर ‘डी.बी.स्टार’ने टाकलेला प्रकाशझोत.

आमच्याकडेच करा टायपिंग
ग्राहकास कामाचे स्वरूप विचारून टायपिंग तसेच साक्षांकन व प्रतिज्ञापत्र करून घेण्याची सक्ती केली जाते. अशा प्रक ारे 100 रुपयांच्या स्टॅम्पसह एकूण 500 रुपये घेतले जातात. एखाद्या ग्राहकाने फक्त स्टॅम्प मागितल्यास स्टॅम्प शिल्लक नसल्याचे सांगितले जाते. एखाद्या जाणकार आणि सुजाण ग्राहकाने आग्रह करून त्यांचे पितळ उघडे पाडण्याचा प्रयत्न केला तर उद्धट भाषा वापरतात. ‘कोणाकडेही तक्रार करा, कोणीही काही करू शकत नाही’, असा दम देतात. विश्ेाष म्हणजे येथे तक्रारपुस्तिका किंवा फलक लावलेला आढळत नाही. या लुटीविरोधात कोणाकडे जावे, त्या संबंधित अधिकार्‍याची माहिती दर्शनीभागात लावण्याची सक्ती असलेली ‘नागरिकांची सनद’ येथे नसल्याने तक्रार कोणाकडे करावी, हे ग्राहकांना समजत नाही.

दस्तामागे 125 रुपये
जुलै महिन्यात ट्रेझरीमधून 5 कोटी 23 लाख 65 हजार 290 रुपये किमतीचे स्टॅम्प विकले गेले. या स्टॅम्प विक्रीद्वारे विक्रे त्यांना 3 टक्के कमिशन मिळते. तहसील कार्यालयातील स्टॅम्प विक्रेते 100 रुपये किमतीच्या स्टॅम्पचे 250 रुपये घेतात. या आकारणीत टंकलेखन खर्चाचा समावेश असतो. एका दस्तासाठी 20 ते 25 रुपये टंकलेखनाचे दर आकारले जातात. म्हणजेच एका दस्तामागे सुमारे 125 रुपये उकळले जातात. अशा पद्धतीने ही रक्कम कोट्यवधी रुपयांच्या घरात जाते.

निबंधकांसमोरही वाद
भाजपचे मंगेश नागरे यांनाही मुद्रांक घेताना हा अनुभव आला. मुद्रांक उपलब्ध असूनही विक्रेत्यांनी देण्यास नकार दिला. या वेळी भ्रष्टाचारविरोधी न्यासचे कार्यकर्ते संजय करंजकर तेथे आले. याबाबत सहदुय्यम निबंधक के. आर. दवंगे यांच्याकडे त्यांनी तक्रार केली. संबंधित विक्रेत्यास दालनात बोलावून विचारणा केली. या वेळी शाब्दिक वाद झाले. दवंगे यांनी लेखी खुलासा मागवला; मात्र समाधानकारक उत्तर न देता, दवंगे यांच्या कार्यवाहीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. ही बाब मुद्रांक विक्री व पुरवठा अधिनियम 1974 चा भंग करणारी आहे. विक्रेत्यांवर कारवाईसाठी मुद्रांक जिल्हाधिकारी रमेश काळे यांच्याकडे पाठपुरावा केला, पण अद्याप कार्यवाही नाही.

तक्रार करणार
तहसील कार्यालयातील मुद्रांक विक्रेते बेकायदेशीरपणे जादा किमतीत स्टॅम्प विक्री करीत आहेत. सहदुय्यम निबंधक दवंगे यांच्याकडे तक्रार केली असता त्यांनी शहानिशा केली. त्यात संबंधित मुद्रांक विक्रेते दोषी आढळले. मी कारवाईची मागणी केली आहे. कारवाई न झाल्यास महानिरीक्षकांकडे तक्रार करेन. मंगेश नागरे, तक्रारकर्ता ग्राहक

बेकायदेशीर विक्री थांबवा
विविध शासकीय कामांसाठी मुद्रांकांची गरज नाही; मात्र लोकांबरोबरच शैक्षणिक संस्था, गॅस एजन्सी, वीज मंडळ हे अज्ञानी असल्यामुळे या संस्थांच्या प्रबोधनाची गरज आहे. बेकायदेशीर विक्री व लोकांना बसणारा भुर्दंड या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने त्वरित दखल घेतली पाहिजे. संजय करंजकर, सदस्य, भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यास