आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stand For Election Against Bhujabal; Godse Challenges Gite

भुजबळांविरुद्ध लढाच; गोडसेंचे गितेंना आव्हान

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मनसेचे प्रदेश चिटणीस आमदार वसंत गिते यांच्यामुळेच पक्षाचा पहिला खासदार दिल्लीत जाऊ शकला नाही, अशी तोफ डागत गिते यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान नुकतेच शिवसेनावासी झालेले नगरसेवक हेमंत गोडसे यांनी मंगळवारी दिले. गिते यांच्या बूथवर फक्त 82 मते मिळाली, ते केवळ तनाने मनसेबरोबर आणि मनाने भुजबळ यांच्याबरोबर होते, असा सनसनाटी आरोपही त्यांनी केला.

पत्रकार परिषदेत गोडसे म्हणाले, ‘‘2007मध्ये जेव्हा मनसेची कोणतीही ताकद नव्हती, तेव्हा स्वबळावर जिल्हा परिषद सदस्य झालो. मनसेचे 12 नगरसेवक असताना लोकसभेसाठी एकही जण उमेदवारी घेण्यासाठी राजी नव्हता. अशा परिस्थितीत दहा वर्षे कमावलेली पुंजी पणाला लावत, स्वखर्चाने निवडणूक लढवली. मात्र, केवळ स्वकीयांनी घात केल्यामुळेच पराभव होऊन मनसेचा पहिला खासदार होऊ शकलो नाही.’’

गिते हे भुजबळांच्या सोयीचे राजकारण करीत असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची दिशाभूल करून नेहमीप्रमाणे आगामी लोकसभा निवडणुकीतही मनसे तुल्यबळ उमेदवार देणार नाही, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. गिते यांनी भुजबळांसमोर निवडणूक लढवली तर सर्व सत्य बाहेर येईल. त्यांनी निवडणूक लढवावीच, असे आव्हानही त्यांनी या पत्रकार परिषदेत दिले.


मी करून दाखवले, त्यांनी काय केले?
जिल्हा परिषद सदस्य असताना केंद्र, राज्य शासनाच्या योजनांतून किती विकास केला, याची कार्यपुस्तिका लोकांसमोर ठेवली. गिते यांनी चार वर्षांत काय केले, याचा लेखाजोखा लोकांसमोर मांडावा; जेणेकरून ‘दूध का दूध, पानी का पानी’ होईल, असा दावाही गोडसे यांनी केला.