आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉपीमुक्त अभियानात एसएससी बोर्ड नापास, गैरप्रकार वाढले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (एसएससी बोर्ड) घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेत यंदा तब्बल १४६ हून अधिक कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, शिक्षण मंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या ‘गैरमार्गाशी लढा’ हे कॉपीमुक्त अभियान यंदा अनुत्तीर्ण ठरले असून, परीक्षेतील गैरप्रकारांची संख्या वाढली आहे. बारावीच्या परीक्षेसह दहावीच्या परीक्षेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली असताना दुसरीकडे परीक्षेत डमी परीक्षार्थी बसविण्यापर्यंत विद्यार्थ्यांची मजल गेल्याने गुणवत्तेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले अाहे. दहावीच्या परीक्षेतील अाठ डमी विद्यार्थ्यांवर थेट पोलिसांनी कारवाई केली असून गुन्हा दाखल केला आहे.

दहावीची लेखी परीक्षा सध्या सुरू असून, येत्या २९ मार्चपर्यंत परीक्षा होणार आहे. दहावीच्या परीक्षेतील गैरमार्ग रोखण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. कॉपीमुक्त अभियानाच्या माध्यमातून परीक्षेतील गैरमार्ग कमी करण्यासाठी शिक्षण मंडळातर्फे मागील काही वर्षांपासून जनजागृतीसह विविध उपक्रम राबविले जात असले तरी यंदा मात्र, कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. दहावीच्या अद्याप पाच ते सहा विषयांची परीक्षा बाकी असताना विभागात मागील वर्षाच्या तुलनेत कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत १४६ विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली.

गुणवत्तेवर निर्माण झाले प्रश्नचिन्ह
‘गैरमार्गाशीलढा’ या अभियानाच्या माध्यमातून परीक्षेतील गैरप्रकार कमी करण्यात यंदा अपयश आल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील वर्षीच्या १३२ विद्यार्थ्यांच्या तुलनेत यंदा परीक्षा संपण्यास अवधी असतानाच १४६ परीक्षार्थींवर कारवाई झाली. गैरप्रकारांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ग्रामीण भागात वाढले सर्वाधिक गैरप्रकार
शहरी भागातील शाळांमध्ये परीक्षेतील गैरप्रकारांची संख्या अत्यल्प अाहे. ग्रामीण भागात कॉपीचे प्रकार वाढले असून, त्यास जबाबदार असलेल्यांवर कारवाई केली जात आहे. डमी विद्यार्थ्यांसह परीक्षार्थी, तेथील केंद्रप्रमुख पर्यवेक्षकांची चौकशी केली जात आहे. गैरप्रकार कमी करण्यासाठी प्रबोधनाबरोबर थेट कारवाई करण्यात येत आहे. - राजेंद्रप्रसाद मारवाडी, विभागीय सचिव, एसएससी बोर्ड
बातम्या आणखी आहेत...