आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची परंपरा रुजली, श्रींच्या मूर्तीचे घरच्या घरी विसर्जन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याबाबत ‘दिव्य मराठी’ने केलेल्या आवाहनाला राज्यभरात भरभरून प्रतिसाद मिळाला. शाडू मातीच्या गणेशाची प्रतिष्ठापना करण्याबरोबरच श्रींच्या मूर्तीचे घरच्या घरी विसर्जन करणे, मूर्ती विसर्जित न करता त्या दान करणे, खर्चात कपात करून दुष्काळग्रस्तांना मदत करणे आदी उपक्रम सामान्य नागरिकांप्रमाणेच सार्वजनिक गणेश मंडळांनीही राबवले. या उपक्रमातून लाखो गणेशभक्तांनी पुरोगामी विचारांच्या दृष्टीने एक पाऊल पुढे टाकले आहे.
नाशिक : पावणेतीन लाख मूर्ती दान
नाशिकमध्ये गणेशभक्तांकडून तब्बल २ लाख ७१ हजार ३८६ मूर्तींचे दान करण्यात आले. ‘देव द्या, देवपण घ्या’ अशा आशयाचे फलक लावून चालवण्यात आलेल्या मूर्तिदान चळवळीला भक्तांनी व मंडळांनी भरभरून पाठिंबा दिला. तसेच तब्बल ९७ टनांहून अधिक निर्माल्यदेखील भाविकांनी दान केले. याशिवाय शाडू मातीच्या मूर्तीचे घराेघरी बादली, टबात विसर्जन करण्याला प्राधान्य दिले.

जळगाव : १५ हजार मूर्तींचे हौदात विसर्जन
‘दिव्य मराठी’च्या पुढाकाराने जळगावात झालेल्या ११ कार्यशाळांतून ६,५०० शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना झाली होती. यापैकी ५ हजार मूर्तींचे घरातच विसर्जन झाले. निर्माल्य संकलनाच्या व्हॅन शहरभर फिरत होत्या. निर्माल्य संकलनात सामाजिक वनीकरण विभाग, पर्यावरण शाळा, अंधश्रद्ध्रा निर्मूलन समिती, राष्ट्रीय हरित सेना, वन्यजीव संरक्षण संस्था आदी संस्थांनी संकलनात पुढाकार घेतला होता.

सोलापूर : विसर्जन घरीच, २०० मूर्ती दान
सोलापूर शहरात शेकडो भाविकांनी शाडू व मातीच्या गणेशमूर्तीची आपापल्या घरी प्रतिष्ठापना केली होती. विशेष म्हणजे या सर्वांनी मूर्तीचे विसर्जनही घरच्या घरीच केले. शाळकरी विद्यार्थ्यांमधून जनजागृती करण्यात आल्याने मोहिमेला चांगले बळ मिळाले. तसेच २०० भाविक व चार मंडळांनीही मूर्ती दान करण्यास पसंती दर्शवली. त्यासाठी महापालिका प्रशासनाने विसर्जन घाटाजवळ विशेष व्यासपीठ उभे केले होते.

धुळे : पाच हजार मूर्ती दान - धुळ्यातही ५४२७ मूर्ती दान केल्या. एन्व्हॉयर्नमेंटल यूथ फ्रेंड्स ग्रुपचे १५ कार्यकर्ते त्यासाठी कार्यरत होते. पालिकेने विसर्जनासाठी पाच कृत्रिम तलाव केले होते.

मुंबई : मुख्यमंत्र्यांचा आदर्श - मुंबईत २५ हजार ४५३ मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही गणरायाचे विसर्जनही महापौर बंगल्यातील कृत्रिम तलावात केले.

पुणे : मानाच्या गणपतींची नवी परंपरा - मानाच्या पाचही गणपतींचे कृत्रिम तलावात विसर्जन झाले. त्यापाठोपाठ १ लाख ९४ हजार घरगुती व सार्वजनिक गणपतींचे कृत्रिम हौदात विसर्जन झाले. २१ हजार २३८ मूर्तींचे दान केले.