आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अधिकाऱ्यांकडूनच मिळते काळ्या बाजाराला खतपाणी, शेतकऱ्यांची फरफट कायम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खरीप हंगामाच्या तोंडावरच कृषी सहसंचालक कार्यालयासह जिल्हा कृषी अधीक्षक आणि तालुका कृषी अधिकारी लाभलेल्या नाशिक जिल्ह्यातच सटाणा तालुक्यातील एका खेड्यात बनावट खतांचा कारखाना राज्यस्तरीय पथकाने शोधून काढत त्याला टाळे ठोकले. मात्र, स्थानिक कृषी अधिकाऱ्यांना या बनावट कारखान्याबाबत तसूभरही माहिती नसावी, याहून दुसरे दुर्दैव कोणते.
कृषी विभागाच्या या निष्काळजीपणामुळे अशा गैरप्रकारांना खतपाणी घातले जात आहे. खरिपातच नाही तर भविष्यातही शेतकऱ्यांची बनावट खते, बियाणे आणि कीटकनाशकांपासून फसवणूक होऊ नये आणि लिंकिंगसारखे प्रकार होऊ नयेत, यासाठी ‘डी. बी. स्टार’ने टाकलेला हा प्रकाशझोत...
राज्यस्तरीय भरारी पथकाला नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात बनावट खतनिर्मिती कारखाना सुरू असल्याबाबत समजते. पथकाकडून तत्काळ कारवाई होऊन हा कारखाना बंद पाडण्यात येतो. यात आश्चर्याची बाब म्हणजे, स्थानिक अधिकाऱ्यांना मात्र याबाबत कुठलीही माहिती नसल्याचे सांगण्यात येते. जिल्ह्यात कृषी सहसंचालकांचे कार्यालय, विभागीय गुणवत्ता नियंत्रक, तसेच जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक नेमून देण्यात आले असतानाही अशा प्रकारच्या घटना सर्रासपणे घडत असल्याने कृषी विभागाच्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मुख्य म्हणजे, नाशिक जिल्ह्याला गुजरात राज्याची सीमा लागून असल्याने या मार्गाने इतर राज्यांतून बोगस खते, बियाणे आणि कीटकनाशके शहरात विक्रीस येत असल्याचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. ज्या अधिकाऱ्यांनी या परिस्थितीवर नियंत्रण ठेवायला हवे, त्यांच्याचकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याने बळीराजाचीच नाहक फरफट होत आहे. कृषी विभागातील काही अधिकारी शेतकऱ्यांविषयी पुळका दाखवत त्यांना कृषी साहित्य, खते, कीटकनाशके खरेदी करताना पक्के बिल घेण्याचा सल्ला देतात.
मात्र, याच अधिकाऱ्यांकडून विक्रेत्यांना पक्क्या बिलाशिवाय कुठलीही वस्तू विक्री करू नये, याबाबत सक्ती केली जात नसल्याचे वास्तव आहे. खरिपामध्ये नाशिक, जळगाव, नंदुरबार, धुळे जिल्ह्यात सर्वाधिक बनावट निविष्ठा विक्री होत असल्याची माहिती आहे. याचे कारण, या चारही जिल्ह्यांना गुजरात आणि मध्य प्रदेश राज्याची सीमा लागून येते. तेथील माफियांकडून महाराष्ट्रातील कंपन्यांना टार्गेट केले जाऊन बोगस खते, बियाणे विक्रीस आणले जातात. यातून शेतकऱ्यांचीच मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असल्याचे दिसून येते. अनेक शेतकरी फसवणूक झाल्यावर समाजात प्रतिष्ठा जाईल, याचा विचार करून अशा विक्रेत्यां विरोधात आवाज उठवत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे अशा प्रकारचे गैरप्रकार अधिक व्यापक प्रमाणावर सुरू आहेत.
थेट प्रश्न- अण्णा भाऊ साठे, जिल्हागुणवत्ता नियंत्रक
- काळा बाजार रोखण्यासाठी काय नियोजन?
खरीप हंगामामध्ये बियाणे, खते आणि कीटकनाशकांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढते. त्यामुळे या दिवसांत काळाबाजार होण्याची अधिक चिन्हे असतात. अशा परिस्थितीत प्रत्येक तालुक्यात एक भरारी पथक आणि जिल्हास्तरावर एक पथक नेमण्यात येते.
- बोगसखते आणि बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास त्यांनी काय करावे?
शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये, यासाठी आम्ही भरारी पथकांच्या माध्यमातून तपासणी करणार आहाेतच. नियंत्रण कक्षाचीही स्थापना केली आहे. त्या ठिकाणी शेतकरी तक्रार नोंदवू शकतात.
- सटाणा तालुक्यात बोगस खतांचा कारखाना होता. त्याची माहिती तुम्हाला कशी नव्हती?
नाही, आमचे कार्यक्षेत्र विस्तृत आहे. माझ्या एकट्याकडून ते पेलवत नाही. त्यामुळे मी वरिष्ठांकडे पत्रव्यवहारदेखील केला आहे. मात्र, वरिष्ठांनी अजूनही मनावर घेतलेले नाही. पंधरा तालुके असल्याने मी एकटा कुठे कुठे लक्ष देणार? बोगस कारखान्याबाबत राज्यस्तरीय भरारी पथकाला माहिती मिळाली, म्हणून त्यांनी या ठिकाणी कारवाई केली.

- तुमच्या क्षेत्रात कारखाना आढळला, यातून तुमचा निष्काळजीपणा स्पष्ट होतो.
निष्काळजीपणा म्हणता येणार नाही. पण, मला याबाबत माहितीच मिळाली नाही.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, बोगस खतांमध्ये केला जातो मातीचा मोठ्या प्रमाणावर वापर...
बातम्या आणखी आहेत...