आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • State Transport News In Marathi, Nashik, Aurangabad ST Depot

राज्यात औरंगाबादचे एसटी आगार ठरले अव्वल!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात 25 वर्षे अपघातविरहित सेवा देणारे चालक, ‘प्रवासी वाढवा’ अभियानात विशेष कामगिरी करणारे वाहक, तसेच प्रवासी वाहतुकीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी करणार्‍या विभागांत औरंगाबाद आगाराने अव्वल क्रमांक पटकावला आहे. परिवहन महामंडळातर्फे उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या आगारांना नुकतेच विशेष सोहळ्यात गौरवण्यात आले.


प्रत्येक विभागाच्या मुख्यालयी झालेल्या या विशेष सोहळ्यात मार्च 2012 अखेरपर्यंत 25 वर्षे अपघातविरहित सेवा केलेल्या चालकांना प्रत्येकी सात हजार रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र आणि त्यांच्या धर्मपत्नीस साडी-चोळी देऊन गौरवण्यात आले. त्याचप्रमाणे, जानेवारी ते मार्च 2011 या कालावधीत राबवण्यात आलेल्या ‘प्रवासी वाढवा’ अभियानात विशेष कामगिरी केलेल्या 245 वाहकांनादेखील प्रत्येकी पाच हजार रुपये व सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या अभियानात प्रवासी वाहतुकीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेल्या विभाग आणि आगारांनाही रोख रक्कम व पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. औरंगाबाद-1 आगाराने जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च या तिन्ही महिन्यांत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावून सर्वाधिक तीन लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले. त्याखालोखाल नालासोपाराने अडीच लाख, तर राळेगाव, वडूज आगारांनी प्रत्येकी दोन लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले. नाशिक विभागातील जळगाव आगाराला एक लाख, तर नाशिक-1 आगाराला केवळ 50 हजार रुपये मिळाले.


पहिलाच उपक्रम
चालकांच्या धर्मपत्नीचाही सत्कार करणारे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हे देशातील एकमेव राज्य परिवहन महामंडळ ठरले आहे. या अनोख्या उपक्रमात चालकांना 32 लाख 76 हजार, वाहकांना 12 लाख 25 हजार, आगारांना 36 लाख 25 हजार, तर विभागांना 5 लाख रुपये असे एकूण 86 लाख 26 हजार रुपयांच्या बक्षिसांचे वितरण करण्यात आले. ज्यामुळे चालक-वाहक आणि अन्य कर्मचार्‍यांनाही सेवा बजावण्यास प्रोत्साहन मिळेल, अशी प्रतिक्रिया महामंडळाच्या अधिकार्‍यांनी बोलून दाखवली.