आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसे-भाजप दुरावा अपक्षांच्या पथ्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - स्थायी समिती निवडणुकीच्या निमित्ताने भाजपबरोबर मनसेचे संबंध दुरावल्यामुळे आता शिवसेनेबरोबरच काँग्रेस आघाडीच्याही महापौरपद मिळवण्याच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. यात अपक्षांचा भाव वधारणार असून, स्थायी समिती निवडणुकीच्या निमित्ताने मनसेने अपक्षांशी जवळीक निर्माण करून त्यादृष्टीने एक पाऊल पुढे टाकल्याचे मानले जाते.

पालिकेत मनसेचे सर्वाधिक 39 नगरसेवक आहेत. भाजपचे 14 नगरसेवक असून, दोघांमिळून 53 संख्याबळ गतनिवडणुकीत होते. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी, तसेच ऐनवेळी शिवसेनाही तटस्थ राहिल्यामुळे मनसेचा महापौर, तर भाजपचा उपमहापौर झाला. राज्यस्तरावर युती असतानाही भाजपने सेनेची साथ सोडल्यामुळे मध्यंतरी दोन पक्षांत तणावाचे संबंध होते. मात्र, पुढे भाजपने शिवसेनेला सोबत घेऊन मनसेसोबत महायुती केली. ही महायुती लोकसभेच्या तोंडावर परिणामकारक ठरेल असे चित्र असताना शिवसेना व मनसे नेत्यातील वादामुळे दुरावा वाढत गेला. त्याचाच परिणाम म्हणून की काय, गेल्या वेळी शिवसेनेची मदत घेणा-या मनसेने यंदा त्यांनाच काय पण भाजपलाही झटका दिला. त्यामुळे आता तीन महिन्यांनंतर होणा-या महापौरपदाच्या निवडणुकीत युती पुन्हा मनसेला धडा शिकविण्याच्या पवित्र्यात आहे.

सद्यस्थितीत शिवसेनेचे 19, रिपाइंचे 3 असे 22, तर भाजपचे 15 नगरसेवक आहेत. दोन्ही मिळून 37 असा आकडा तयार होत असून, याव्यतिरिक्त माकप व जनराज्यमधील तीन नगरसेवकांच्या संभाव्य पाठिंबाच्या जोरावर हा आकडा 40 पर्यंत पोहोचत आहे. तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे 20, तर काँग्रेसचे 14 सदस्य असून, त्यांचे संख्याबळ 34 आहे. याव्यतिरिक्त माकपची 2, तर अपक्षांची सहा मते आहेत. त्यामुळे ही मते मिळवून राष्ट्रवादी व काँग्रेसचा महापौरपद मिळवण्यासाठी आगामी काळात दावा राहणार आहे. मात्र, काँग्रेस आघाडीपेक्षा सद्यस्थितीत युती व मनसेमध्येच रस्सीखेच राहील, असे चित्र असेल.

विधानसभेवरच ठरेल गणित
एकूणच परिस्थिती बघितली, तर मनसे व युतीतील वादात अपक्षांचा भाव वधारणार असल्याचे चित्र तूर्तास दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीतील राजकीय तडजोडी व संभाव्य सत्तांतरणावरही बरीच गणिते अवलंबून असतील, असे अनेक राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.