आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तीन हजार उमेदवारांची एसटीआय परीक्षेस दांडी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीने रविवारी घेण्यात आलेल्या विक्रीकर निरीक्षक पदाच्या (एसटीआय) पूर्व परीक्षेस नऊ हजार 113 उमेदवारांनी हजेरी लावली. तर, साडेतीन हजार उमेदवारांनी परीक्षेला दांडी मारली. विशेष म्हणजे, मागील तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या सर्व्हर डाउनच्या समस्येने हॉलतिकीट मिळण्यात विलंब झाला. त्यामुळेही अनेक उमेदवारांना परीक्षा देता आली नाही अशी चर्चा मात्र, परीक्षेच्यावेळी कुठलीही अडचण आली नाही.

आयोगाकडून परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना ऑनलाइन हॉलतिकीट उपलब्ध करून देण्यात आले. मात्र, सर्व्हर डाउन झाल्याने उमेदवारांना ते मिळण्यात अडचण आली. सकाळी 11 ते 12 या वेळेत पेपर झाल्याने रविवार असतानाही महाविद्यालयांचे कॅम्पस गर्दीने फुलून गेले होते. पेपर सुटल्यानंतर मात्र विद्यार्थ्यांनी आपापसांत चर्चा करताना आयोगाच्या भोंगळ कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली. नाशिकमध्ये एकूण 34 केंद्रांवर परीक्षा पार पडली. 12 हजार 526 उमेदवारांनी परीक्षेचे अर्ज भरले होते. त्यापैकी 3 हजार 413 उमेदवारांनी परीक्षेला दांडी मारली. या आकडेवारीवरून प्रथमत: अनेक उमेदवारांना हॉलतिकीटच न मिळाल्याने परीक्षेस बसता आले नसल्याचा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, परीक्षा सुरळीत पार पडल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांनी सांगितले.