नाशिक - येत्या शनिवारी (दि. 5) सादर करण्यात येणारे महापालिकेचे अंदाजपत्रक एका नव्या वादात सापडले आहे. अंदाजपत्रकाच्या प्रतिवर विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींऐवजी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा फोटो प्रसिद्धीला विरोधी पक्ष शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. ‘मोदींच्या नावावर मते मागतात, मग त्यांचा विसर कसा पडला,’ असा टोला विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांनी लगावला आहे. या वाद प्रकरणाला सत्ताधारी कसा मार्ग काढतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महापालिकेचे हे अंदाजपत्रक तब्बल 2900 कोटी रुपयांचे आहे. स्थायी सभापती निवडीअभावी सदरचे अंदाजपत्रक रखडले होते. ते सादर करण्यासाठी आता महापौर अॅड. यतिन वाघ यांनी 5 जुलैला विशेष सभा बोलावली आहे. सदर अंदाजपत्रकाच्या प्रतिवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. वास्तविक पाहता दि. 26 मे रोजीच पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतली आहे. अन् सदरच्या अंदाजपत्रकाचा प्रस्ताव महापालिकेने दि. 17 जून रोजी पाठविला आहे. या प्रकाराला शिवसेनेने आक्षेप घेतला असून, मोदींच्या नावाने मते मागतात मग त्यांचा विसर कसा, असा टोला भाजप व मनसेला लगावला आहे. त्यामुळे सदरचे अंदाजपत्रक हे वादात सापडले असून, यातून सत्ताधारी मनसे व भाजप या वादावर कसा पडदा टाकतात, हे पाहणे मोठे औत्सुक्याचे ठरेल.