आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठेकेदारांना पळता भुई.. संशयाची सुई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- स्थळ महापालिकेचे राजीव गांधी भवन येथील मुख्यालय... सायंकाळी सहालाच बंद होणारे कामकाज मध्यरात्रीनंतरही सुरू... वादग्रस्त ठेकेदारांबरोबरच खास निमंत्रितांची मनधरणी... कोणाची निवदिा मागे घेण्यासाठी, तर कोणाची वाढीव दर कमी करण्यासाठी...
मुख्यालयातील हा ‘मध्यरात्रीचा दरबार’ रंगात आला असताना अचानक गलका माजतो. नगरसेवकांनी धाड टाकल्याची वर्दी येते. मग मिळेल त्या ठिकाणी दडी मारण्यासाठी ठेकेदारांबरोबरच कर्मचाऱ्यांची पळापळ सुरू होते. अगदी स्वच्छतागृहासारखी जागाही अशावेळी कोणाला वर्ज्य नसते...
मंगळवारी मध्यरात्री स्थायी समिती सभापतींसह काही नगरसेवकांनी टाकलेल्या या छाप्याची खुसखुशीत चर्चा बुधवारी महापालिकेच्या वर्तुळात रंगली होती. विशेष म्हणजे, महापालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम स्वत मुख्यालयात कामकाज करीत असताना नगरसेवकांनी छापा टाकण्यापर्यंतचे पाऊल का उचलले, असाही प्रश्न निर्माण झाला आहे.
कुंभमेळ्याच्या निमित्ताने सध्या महापालिकेत कोट्यवधी रुपयांच्या निधीची ‘गंगा’ वाहत आहे. पर्वणी तोंडावर असल्यामुळे अनेक कामांचा तातडीने निपटारा करण्यासाठी अधिकारीही दिवसाची रात्र करत आहेत. त्यामुळे दिवसा स्पॉट व्हिजिट आणि रात्री कार्यालयीन कामकाज असे ‘स्मार्ट वर्क’ करण्याचा प्रघात सुरू झाला आहे. महापालिकेत मध्यरात्र उलटल्यानंतरही ठेकेदार, अधिकारी कर्मचाऱ्यांच्या भरणाऱ्या या दरबाराची चर्चा होती. मात्र, मंगळवारी या दरबारात वेगळाच नजराणा पेश होणार असल्याची बातमी फुटली आणि आहे त्या अवस्थेत काही नगरसेवकांचा मोर्चा महापालिकेवर येऊन धडकला. या मोर्च्याचे नेतृत्व स्थायी समिती सभापती शिवाजी चुंभळे यांच्याकडे होते. त्यांच्यासमवेत असलेल्या मनसे, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी बाह्या सरसावल्या. मुख्य प्रवेशद्वारावर कॅमेरे रोखले गेले. दरबारासाठी प्रविष्टित होणाऱ्या ठेकेदारांना ‘फायलीत काय दडलेय’ अशी विचारणा सुरू झाली. एक प्रकारे स्टिंग ऑपरेशनच सुरू झाल्याचे पाहून उगाच अडचण नको म्हणून पळापळ सुरू झाली.
स्थायी समितीत जादा विषयांवर फुली
स्थायी समिती बैठकीच्या पार्श्वभुमीवर काही जादा विषय प्रशासनाने ठेवले. यातील काही विषयांचा संबंध रात्रीच्या लगबगीशी असल्याच्या संशयामुळे स्थायी समितीने सर्वप्रथम आयत्या वेळी आलेले जादा विषय मंजूर करण्यास नकार दिला. या कामांचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्नही झाला. मात्र, आजची बैठक तहकूब करून ती भले दाेन दिवसांनी घेऊ, मात्र आता मंजुरी नाहीच, अशी ठाम भूमिका घेण्यात आली.
तीन कंत्राटे आहेत चर्चेत
महापालिकेत सध्या तीन कंत्राटे चर्चेत असून, त्याच्याशी संबंधित व्यक्तीही रात्रीच्या दरबारात दिसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. प्रामुख्याने पाच हजार तात्पुरत्या स्वच्छतागृहांशी संबंधित निवदिेचा संबंध आहे. दुसरीकडे, सिंहस्थाच्या पार्श्वभुमीवर तात्पुरत्या स्वरूपात ३३०० सफाई कर्मचाऱ्यांच्या भरतीची निवदिा असून, संबंधित कामावरून आधीच मनसेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. या व्यतिरिक्त घंटागाडीच्या ठेक्याचा महत्त्वपूर्ण विषय चर्चेत असून, या सर्व कामांबाबत नेमके काय करायचे, याचाच खल उशिरापर्यंत झाल्याचे समजते.
झाले ‘स्टिंग’, फुटले बिंग...
स्थायी समितीची बुधवारी सभा असल्यामुळे सभापतींसह काही सदस्य ‘स्ट्रॅटेजी मीटिंग’साठी एकाठिकाणी जमले होते. काही नगरसेवक आपली वाहने महापालिका आवारात ठेवूनच बैठकीसाठी गेले. तिकडून परतल्यावर काही बहुचर्चित ठेकेदारांची गर्दी, त्यांची वाहने आणि वेगळीच लगबग दिसल्याने सभापतींसह अन्य नगरसेवक महापालिकेत घुसले. त्यानंतर झालेली पळापळ पाहून सारेच थक्क झाले.
बातम्या आणखी आहेत...