आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्लिमांची दिशाभूल थांबवत मानवतेचा संदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मुस्लिम धर्मातील तरुणांची दिशाभूल करणाऱ्या संघटनांविरोधात देशभरात चळवळ सुरू अाहे. राष्ट्रीय धर्मगुरू कायद-ए-मिल्लत हजरत सय्यद महेमूद अशरफ अशरफी जिलानी यांच्यामार्फत अाता देशभरात दहशतवादविराेधी मोहीम राबविली जाणार आहे. यासाठी मुंबईपाठोपाठ नाशकात रविवारी अहले सुन्नत रिसर्च सेंटरचे उद्घाटन करण्यात आले असून राज्यासाठी हे मध्यवर्ती कार्यालय राहणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून ‘इस्लाम’ची खरी शिकवण तरुणांना देऊन मानवतेचा संदेश सर्वदूर पोहोचवण्याचे कार्य केले जाणार अाहे.
‘इसिस’चा निषेध करण्यासाठी मुस्लिम बांधवांकडून विशेष मोहीम राबविली जात अाहे. यंदा मुस्लिम धर्मात अत्यंत महत्त्वाचा पैगंबर जयंतीचा दिवस अर्थात जश्न-ए-ईद मिलाद ‘यौमे अमन’ म्हणजे शांतता दिवस म्हणून साजरा करण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून जगभरात ‘इस्लाम’ धर्माच्या नावाखाली काही दहशतवादी संघटना हल्ले करत आहेत. अशा संघटनांचा ‘इस्लाम’शी काहीही संबंध नसताना त्यांच्याकडून ‘इस्लाम’चे नाव वापरले जात आहे. तसेच जिहादच्या नावावर चालणारे गैरप्रकार, दहशतवाद चुकीचा अाहे. ‘इस्लाम’ची खरी शिकवण जिहादला कधीही परवानगी देत नाही. गरीब व शोषितांना मदत करणे आणि त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे हा "जिहाद’चा भाग आहे. ही खरी शिकवण तरुणांमध्ये रुजणे गरजेचे अाहे. त्यामुळे या सर्व बाबींची माहिती तरुण पिढीला या केंद्राच्या माध्यमातून करून दिली जाणार आहे.

सोशल मीडियाद्वारे प्रबोधन : सोशल मीडियाच्या माध्यमातून काही तरुण ‘इसिस’शी जोडले जात आहेत. अशा तरुणांना कुराण व इस्लामची शिकवण देण्याचे कार्य या केंद्रातून केले जाईल. सोशल साइट्सवर केंद्रांची माहिती दिली जाईल. साइट्सवर या केंद्राचे पेजदेखील तयार करण्यात आले आहे.

देशभरात केंद्र : देशातील विविध ठिकाणी या केंद्रांची स्थापना करण्यात येणार अाहे. लवकरच मालेगाव, नागपूर, पुणे व गुजरातमधील सुरतमध्येही केंद्राचे काम सुरू होईल, अशी माहिती हजरत सय्यद महेमूद अशरफ यांनी दिली.

तरुणांत जनजागृती : दहशतवादाला मुस्लिम धर्माशी जोडणे निंदनीय आहे. ईश्वराला मानणारे कधीही दहशतवादी होऊ शकत नाहीत. हा धर्म दहशतवाद संपविण्यासाठीच आहे. आज जगात इस्लामची प्रतिमा स्वच्छ करण्याची गरज निर्माण झाली आहे. इस्लाम बांधवांनी अतिरेक्यांना उघडे पाडून आपल्यावरील संशय दूर करण्याची गरज आहे. यासाठी देशभरात अहले सुन्नत रिसर्च सेंटरच्या माध्यमातून दहशतवादविरोधी मोहीम राबविण्यात येणार आहे. या केंद्रातून युवकांत जनजागृती करून इस्लामचा खरा अर्थ त्यांना सांगण्यात येईल, असे कायद-ए-मिल्लत हजरत सय्यद महेमूद अशरफ अशरफी जिलानी म्हणाले.

नाशकात परिषद
जुने नाशिक येथील बडी दर्गाह परिसरात रविवारी ‘जश्ने इफ्तेताह’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळीही कायदे मिल्लत सय्यद महेमूद अशरफ यांनी हेच विचार मांडले. शहर-ए-खतीब हाफीज हिसामोद्दीन साहब खतीब, मुफ्ती रजाउल हक साहब, मौलाना कमाल आलम, एम. एन. बारी साहब, सिरत कमिटीचे सचिव सय्यद मीर मुख्तार अशरफी अादी उपस्थित होते.