आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

युवकाने साकारला इगतपुरीत ‘स्वदेस’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - घोटभर पाणी मिळविताना डोळ्यातून येणारे पाणी ‘त्याच्या’ नजरेने हेरले. या आसवांची जागा आनंदार्शू घेतील असा निश्चयच त्याने केला आणि शेवटी त्या पाड्यावरील लोकांची तहान भागविण्यासाठी स्वखर्चातून कोल्हापूर पद्धतीचा बंधारा त्याने बांधला.
दत्तात्रय पिंगळे असे त्याचे नाव. तो पुण्यात एका खासगी कंपनीत काम करतो. इगतपुरीतील आमळी डोंगर पायथ्याशी असलेल्या गडगडसांगवी या पाड्यावरील गावकर्‍यांची वाटीभर पाणी मिळविण्यासाठी झालेली अवस्था पाहून तो अंतर्मुख झाला. एक विहिरीत एक महिला वाटीने अनेक टांगत्या पोहर्‍यांमध्ये पाणी भरत होती. हे त्याने पाहिले आणि गावातील इतर काही सामाजिक जाण असणार्‍या मंडळींना साथीला घेत बंधारा कामास सुरुवात झाली. सर्वांचे सहकार्य आणि त्याचे अर्थसाहाय्य असे किमान 35 ते 40 हजार रुपयांत बंधारा तयार झाला.
असंख्य अडचणी - जागा डोंगर पायथ्याला असल्याने अगदी फुटावरच कठीण खडक लागला. वेळोवेळी बुलडोझरसारख्या मशीनची गरज पडू लागली. सर्वांपुढे आर्थिक प्रश्न उभा राहिला. शेवटी त्यासाठी आपला एक पगार खर्च करण्याचे दत्तात्रयने ठरवले आणि काम पुन्हा वेगात सुरू झाले. सुदैवाने दगड फोडताना जिवंत पाणी लागले. पावसाळ्यात वन्य प्राण्यांनाही प्यायला पाणी मिळेल. डोंगरावर देवी मंदिरात जाणार्‍या भक्तांना या पाण्याचा सर्वात जास्त फायदा होईल. हा प्रकल्प राबविताना शरद पिंगळे विचार मंचच्या कार्यकर्त्यांबरोबरच हिरामण शिंदे, गणपत बेंडकुळे, भारत शिंदे, दौलत बेंडकुळे आदींनी खूप पर्शिम घेतले.
प्रेरणास्थान ‘राळेगणसिद्धी’ - दत्तात्रयने अलीकडेच राळेगणसिद्धीला भेट दिली आहे. तेथील गावकर्‍यांनी पाण्याचे केलेले सुयोग्य नियोजन, नद्या-नाल्यांवर बांधलेले कोल्हापूर बंधार्‍यांची त्याला आठवण झाली. गावकर्‍यांसमोर त्याने व त्याच्या काही मित्रांनी एक कोल्हापूर बंधारा बांधण्याचा मानस बोलून दाखवला. गावकरीही तयार झाले. त्यांनी आमळी डोंगराचा परिसर तुडवला. सगळीकडे बाभळी, खुरटी झाडं. शेवटी भरपूर पाणलोट क्षेत्र व नैसर्गिक परिस्थितीचा फायदा घेता येईल, अशी गणपत बेंडकुळे यांची जागा मिळाली. शरद पिंगळे विचार मंचचे कार्यकर्ते व गावकरी मिळून उत्खनन सुरू झाले.