आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारा वर्षांपूर्वी कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीत हरवले अन् नाशिकचेच झाले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गेल्या कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर अनेक बालके हरवली. ही सगळी सापडली खरी; परंतु अनेकांना त्यांचे पालक भेटलेच नाहीत. अशी नऊ मुले आजही गोदाकाठावरील काही कुटुंबांत वाढत आहेत. आता तुमचे खरे आईवडील आले तर जाणार का, असे कुणी विचारले तर ही मुले स्पष्टपणे नकार देतात. कारण त्यांना आईवडिलांचे प्रेम देणारे पालकही मिळाले आणि हक्काचे घरही...

रामा : अतिशय मितभाषी. त्याला आज बारा वर्षांपूर्वीचे काहीच आठवत नाही. गेल्या कुंभमेळ्यात (२७ ऑगस्ट २००३) तो होता अवघा ३ वर्षांचा. घटनेनंतर गोदाकाठी भटकत राहिला. कधी पाण्यात खेळायचा. रात्र झाली की रडायचा. त्याला सुनीता ओणि विनोद पवार या दांपत्याने सांभाळले. गोदाकाठी एका टपरीवजा घरात या कुटुंबाचं वास्तव्य. त्यांना एक मुलगा, एक मुलगी असतानाही त्यांनी रामाला सांभाळलं. सुनीताताई सांगतात, त्या वेळी माझी बहीण आमच्याकडे होती. ती कपडे धुण्यासाठी नदीवर गेली असता हा रामा तिच्या मागे आला. आम्हाला त्याचा लळा लागला. रामा आमचाच झाला आहे. तो लोकमान्य शाळेत पाचवीत शिकतो. पवारांच्या चहाच्या टपरीवरही तो जमेल तशी मदत करतो. त्याला त्याच्या हरवण्याविषयी वा पुन्हा आईवडील आले तर याविषयी विचारले तर मात्र थोडा राग येतो. त्याला आता कुठेही जायचे नाही, हेच त्याच्या डोळ्यांतून दिसते.
राहुल : रामसेतू पूल ओलांडला की समोरच एका वडापावच्या गाडीवर भजी, वडे तळताना दिसतो तो राहुल. तेव्हा तो चार-पाच वर्षांचा होता. राहुल राजू दंतने हे त्याचे जुने नाव त्याला अाठवते. येथे भुर्जीपावची गाडी चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या सरोज आणि राजेंद्र चौधरींनी त्याला सांभाळले. दोन मुले आणि दोन मुली असतानाही गोदाकाठी फिरणाऱ्या राहुलला त्यांनी आधार दिला. ८ वर्षांपूर्वी पतीच्या निधनानंतर सरोजताईंनी या पाच मुलांना नेटाने सांभाळले. आता राहुल आणि त्याची भावंडं स्टॉल चालवून कुटुंब कबिला चालवतात.
पूजा : तिला आठवते तीची आई आणि छोटी बहीण. पूजा गेल्या कुंभमेळ्यात हरवली. आधी गोदाकाठावरील एका चहावाल्याने सांभाळले. पण त्याचे आणि पत्नीचे भांडण झाल्यावर त्याने तिला सोडून दिले. एक जण तिला शिर्डीला घेऊन गेला. भीक मागायला लावली. आता जमुना धर्वे तिचा सांभाळ करतात. . जमुनाताईंचा भाऊ स्व. सागर शिंदे याचेदेखील गोदाकाठावर हॉटेल होते. त्याने मग पूजाला जमुनाताईंच्या हवाली केले. त्यांनीच तीचं सरोज हे नाव बदलून पूजा ठेवले. दोन वर्षांपूर्वी पतीचे निधन झाले. जुने कपडे विकून कसातरी उदरनिर्वाह सुरू आहे. पण पोरीची कसलीही तक्रार नाही. पूजाला भविष्यात चांगला साथीदार मिळावा, घर मिळावं एवढीच अपेक्षा असल्याचे धुर्वे सांगतात.

राणी : खरं तर हे तिचे नाव नाही, पण आज ती खरेच राणी आहे. भाजीबाजाराजवळील साई मंदिराशेजारी पाण्याच्या टाकीजवळ राणी त्या दिवशी रडत बसली होती. चार वर्षांची असेल. ती का रडते आहे हे विचारण्यासाठी भाजीविक्रेते दिलीप कुरणे गेले. कुरणेंना लक्षात आले की ही मुलगी हरवलेली आहे. कुरणेंनी तिला आपल्या घरी नेले. आज ती १६ वर्षांची आहे. कुरणेंच्या घरातीलच एक सदस्य झाली आहे.
आता कुठे जायचे नाही...
मुले इतरत्र भटकण्यापेक्षा चांगली घरे मिळाली तर उत्तमच या उद्देशाने पाेलिसांनी मुले या पालकांकडेच ठेवली. पालकांनीही या मुलांना नेण्यासाठी काेणी अाले तर त्यांना पाठवायला तयार आहोत, अशी हमी दिली. पण ज्यांनी सावली दिली, आधार दिला त्यांना सोडून आता या मुलांनाच कुठे जाण्याची इच्छा नाही.