आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Student Foundation In Nashik Collages For Security

‘भयमुक्त महाविद्यालय’साठी सरसावल्या विद्यार्थी संघटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शहरातील महाविद्यालयांतील गेल्या काही दिवसात गैरप्रकार वाढले आहेत. या सगळ्यांतून मार्ग काढण्यासाठी शहरातील प्रमुख विद्यार्थी संघटनांनी एकत्र येत बुधवारी (दि. १८) पोलिस उपायुक्तांची भेट घेतली. या भेटीचे फलित म्हणून महाविद्यालयांत आता ‘भयमुक्त महाविद्यालय’ हे अभियान राबविले जाणार आहे.

नामांकित महाविद्यालयांत होणाऱ्या भानगडी, दोन गटांमध्ये होणारे वाद त्यामुळे वार्षिक महोत्सवावर येणारे भीतीचे सावट या सगळ्या प्रकरणांतून एका विद्यार्थ्याचा बळी गेला आहे. या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी महाविद्यालयांत सुव्यवस्था आणि विद्यार्थ्यांमध्ये जागृती असणे गरजेचे आहे.
पोलिस उपायुक्तांच्या घेतलेल्या भेटीनंतर विद्यार्थी संघटनांनी दिलेल्या सुरक्षाविषयक निवेदनामध्ये त्यांनी आपल्या महाविद्यालयात गरजेची असलेली सगळी मदत करण्यास पोलिस नेहमीच तयार असतील, असे आश्वासन दिले. प्रामुख्याने महाविद्यालयीन घटनांवर पोलिसांचे नियंत्रण असल्यास अशा विपरित घटनांना आळा बसेल, अशी या संघटनांची मागणी होती.

या समस्येवर उपाय म्हणून पोलिसांनी महाविद्यालयांत यापूर्वी लाँच केलेल्या ‘आय वॉच’ या मोबाइल अॅप्लिकेशनबद्दल माहिती देण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर ‘भयमुक्त महाविद्यालय’ या संकल्पनेंतर्गत त्यांनी आपल्या महाविद्यालयात घडणाऱ्या कोणत्याही विपरित कृत्याची माहिती पोलिस यंत्रणेला ताबडतोब दिली जाणार आहे. यासाठी पोलिस नियंत्रण कक्षाचे दूरध्वनी क्रमांक तसेच विद्यार्थी समन्वय समितीच्या काही पदाधिकाऱ्यांचे भ्रमणध्वनी देण्यात आले आहेत.
येत्या काही दिवसांत शहरातील प्रमुख महाविद्यालयांसह इतर सगळ्या लहान-मोठ्या महाविद्यालयांत याचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे विद्यार्थी संघटनांतर्फे सांगण्यात आले आहे. या वेळी भूषण काळे, राकेश पवार, अमोल गायकवाड, ओमकार मते, दर्शन पाटील, योगेश गांगुर्डे, देवांश जोशी आदी विद्यार्थी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

असे शोधता येईल अॅप...

इंटरनेटवर गुगल प्ले सर्च करून त्यावर आय वॉच किंवा आय वॉच पोलिस, पोलिस, सिक्युरिटी अॅप असे की-वर्ड वापरून आय वॉच शोधता येणार आहे. समोर आलेल्या आय वॉच शेजारील इन्स्टॉलवर क्लिक केल्यास हे अॅप डाउनलोड करता येईल. ते फक्त ३.५४ एमबीचे असल्याने सहज तुमच्या फोनमध्ये समाविष्ट करता येईल.
‘आयवॉच’चे महत्त्वाचे फायदे

- अॅक्टिव्हेशननंतरचा ऑडिओ रेकॉर्ड करून पाठवला जाईल.
- तत्काळ एसएमएस आणि कॉलद्वारे पोलिसांना माहिती दिली जाईल.
- तुमचे अॅक्टिव्हेशन वेळेचे लोकेशन आणि नंतर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दिला जाईल.
- फोनच्या अॅक्टिव्हेशन वेळची बॅटरी स्टेट आणि सिग्नल स्ट्रेंथ पोलिसांना त्वरित कळवली जाईल.
‘आय वॉच’ हे सार्वजनिक ठिकाणी वावरणाऱ्या प्रत्येकासाठीचे अॅप आहे. ज्यामध्ये महिला, पालक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांचा समावेश होतो. यामध्ये आयवॉच पोलिस आणि आयवॉच वुमन असे प्रकार आहेत. तुम्हाला ज्या-ज्या ठिकाणी असुरक्षित वाटेल त्या-त्या ठिकाणी या अॅपचा उपयोग होऊ शकतो. यामुळे तत्काळ पोलिसांना तुमच्या लोकेशनची माहिती मिळते.
पोलिसांचे सर्वतोपरी सहकार्य राहील....
^शहरातील विविध महाविद्यालयांत पोलिस नेहमीच कोणत्या ना कोणत्या निमित्ताने जात असतात. विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यासाठी विविध कार्यक्रमही पोलिस यंत्रणेकडून घेतले जातात. पूर्वी विद्यार्थ्यांबरोबरच महिला सुरक्षेसाठीही आम्ही ‘आयवॉच’ हे अॅप विकसित केले होते. विद्यार्थी संघटनांनी या अॅपविषयी महाविल्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांत जनजागृती घडवून आणावी, या अॅपच्या वापराच्या संदर्भात लागणारे संपूर्ण साहाय्य पोलिस यंत्रणा करणार आहे. संदीपदिवाण, पोलिसउपायुक्त