आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांना अाईची माया देणारी प्रेमळ शिक्षिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संपर्कात आलेल्या प्रत्येकाला आपलेसे करणाऱ्या मायावती अशाेक टिळक ऊर्फ टिळकबाई यांची गुरुवारी (दि. मे) नव्वदावी जयंती. त्यानिमित्त त्यांच्या अाठवणींना उजाळा... 
 
‘हौशी आणिदया’, ‘आमची शिल्लक’ हे लक्ष्मीबाई टिळक लिखित ‘स्मृतिचित्रे’ या आत्मचरित्रातील उतारे अाठवी, नववीच्या मराठी पाठ्यपुस्तकात असत. मला आठवतं, आमच्या मराठीच्या बाईंनी सांगितलं होतं, ‘लक्ष्मीबाई टिळक माझ्या आजेसासूबाई’. ही ओळख ऐकून वर्ग हरखून गेला होता. 
 
सौ. मायावती अशोक टिळक या एक विद्यार्थीप्रिय शिक्षिका. अहमदनगर, औरंगाबाद, कोसबाड-चिंचणी आणि नाशिकमध्ये त्यांनी अध्यापन केले. आदर्श शिक्षिका म्हणून नाव कमावले. त्यांचा जन्म बारामतीचा आणि शिक्षण मुंबईच्या सेंट कोलंबा शाळेत झाले. मॅट्रिकची परीक्षा झाली आणि त्या लग्न होऊन नाशिकला आल्या, ॲड. देवदत्त टिळक यांची सून म्हणून. घरात साहित्यिक वातावरण, अनेकांशी जवळून परिचय. त्यांचा स्वभाव मनमिळावू, प्रेमळ, सदैव हसतमुख. प्रबोधनकार ठाकरे आणि टिळकांचा खूप जवळचा संबंध. प्रबोधनकार तिला तिच्या हसऱ्या चेहऱ्याला साजेसे कुसूम (माहेरचे नाव) ऐवजी ‘हसूम’ म्हणून हाक मारीत. 
 
प्रकृतीच्या कुरबुरी लहानपणापासून चालत होत्या. तरीही कंटाळता, घर-संसार सांभाळत त्यांनी आपले बी. एड.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. इंग्रजी, मराठी आणि इतिहास हे त्यांचे विषय. ‘बाई एकही मराठी शब्द वापरत नाहीत. तरीही इंग्रजी कसं समजतं आम्हाला!’ विद्यार्थ्यांना कळत नसे. व्याकरण शिकविण्यात त्या वाकबगार होत्या. त्यांच्या गोड आवाजातील कविता ऐकणे, कवितांच्या चाली शिकणे हा एक वेगळाच आनंद असे. इतिहासाचा तास म्हणजे नाट्य आणि कथाकथन. मुलांच्या डोळ्यासमोरून एक-एक घटना तरळत जाई.
 
टापटीप, आपलेपणा, वक्तशीरपणा, कामाची तत्परता, हसून-खेळून वागणे-बोलणे या साऱ्या गुणांमुळे त्या सर्वांना आपलेसे करीत. गरजू-गरीब विद्यार्थ्यांशी त्यांचा हात नेहमी पुढे असे. फी, वह्या-पुस्तके, गणवेश, जेवण-खाण, औषधे कसलीही मदत करायला त्या मागे पुढे पाहत नसत. आज ज्येष्ठ नागरिक असलेल्या त्यांच्या विद्यार्थ्यांचे हे अनुभव : ‘आज माझी मुलं डॉक्टर, इंजिनिअर आहेत, त्याला कारण टिळकबाई. मी खेड्यातल्या गरीब घरातला. नाजुक परिस्थिती. नाशिकला शिकायला आलाे. सगळ्याच गोष्टींची नेहमीची चणचण. अशावेळी टिळकबाईंनी वेळोवेळी हरप्रकारे मदत केली नसती तर मी शाळा सोडून कुठे तरी चपराशी म्हणून राहिलो असतो. 
 
‘मी अगदी लहान असताना माझी आई वारली. आमच्या शाळेत टिळकबेन (कोसबाड-चिंचणी भागात बाईंना हे संबोधन) रुजू झाल्या आणि त्यांनी आम्हा मुलांना आपलेसे केले. मला तर त्यांनी आईची माया दिली. मी त्यांच्या घरात पूर्णपणे रुळलो. त्यांच्याबरोबर त्यांच्या नातलगांकडे परगावीही जात असे’, आवंढ्यामुळे त्यांना पुढे बोलवेना.
 
कोसबाडला असताना १९६५ साली भारतीय जवानांच्या मदतीसाठी फंड उभा करण्याचे ठरले. त्यात त्यांचा मोठा सहभाग होता. ‘चिक्की’ ही त्यांची खास पाककृती. दिवसभर घाणा चाले. सतत आठवडाभर परिश्रम करून त्यांनी मोठी रक्कम मिळवून दिली. अहमदनगरमध्ये स्वत:चे कॉलेज शिक्षण आणि एसटीसीचा अभ्यासक्रम पूर्ण करायला त्यांची खूप धावपळ होत असे. घरापासून कॉलेज खूप लांब. तेव्हा त्यांनी सायकल वापरायला सुरुवात केली. त्या काळी हे दृश्य फार नवलाईचे होते. 
 
नाशकात परतल्यावर ‘नागरिक छापखाना’ हे नवे कार्यक्षेत्र त्यांनी स्वीकारले. छापखान्याची सर्व कामे शिकून घेतली. त्या काळात ‘नागरिक प्रकाशन’ ही त्यांनी सांभाळले. कालांतराने संधिवातामुळे त्यांना घराबाहेर पडणे महाकठीण होऊन गेले. पत्रलेखन आणि टेलिफोन यांच्यामुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा राहिला. आजारपणात तक्रार, कुरकुर कधीही नसे. घरी आलेल्यांचे हसतमुखाने स्वागत करणे आणि त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारणे हे त्यांचे एक टॉनिक होते. आपल्या वाचनाच्या वेडाने त्यांना कधीही एकटे, निराश वाटू दिले नाही. पुस्तके वाचायची, ती आवडली की इतरांना आग्रहाने वाचायला द्यायची हा त्यांचा नेम. त्यांनी वाचलेलं शेवटचं पुस्तक ‘माझं लंडन’ त्यांना ते फार आवडलं. आपल्या सेंट कोलंबा शाळेच्या १०० व्या वर्धापनाच्या स्मरणिकेत त्यांचा अखेरचा लेख प्रसिद्ध झाला होता. माझ्या प्रिय आईच्या प्रेमळ स्मृतीस माझे शतश: प्रणाम. -मुक्ता अ. टिळक 
बातम्या आणखी आहेत...