आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फीसाठी विद्यार्थी शाळेबाहेर; सिल्व्हर ओक शाळेतील प्रकार, विद्यार्थी वेठीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शाळेच्या निलंबित कर्मचाºयांच्या पाल्यांना शालेय फी भरली नाही म्हणून शाळा व्यवस्थापनाकडून अपमानास्पद वागणूक देत वर्गाबाहेर हाकलून देण्याचा प्रकार शहरातील एका नामवंत शाळेत घडला. निलंबित शिक्षक आणि व्यवस्थापनाच्या वादात विद्यार्थ्यांना वेठीस धरून त्यांचा शिक्षणाचा हक्क डावलण्यात आल्याने पालकवर्गात संताप व्यक्त होत आहे.

शहर पोलिस आयुक्तालयाशेजारी असलेल्या सिल्व्हर ओक शाळेमध्ये गुरुवारी सकाळी हा संतापजनक प्रकार घडला. शाळेचे निलंबित शिक्षक विजय मरसाळे, गोरख शितोळे, राजेंद्र पैठणकर, संतोष खैरनार, बाजीराव आढाव यांच्या आठ पाल्यांना सकाळी फी न भरल्याचे सांगत वर्गाबाहेर हाकलून देण्यात आले. शाळेच्या आवारात त्यांच्यावर पोलिसांच्या वेशात असलेल्या सुरक्षारक्षकांकडून एकाच ठिकाणी बसण्यासाठी दमबाजी करण्यात आली. मुलांवर कॅमेºयाद्वारे पाळत ठेवण्यात येत होती. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी शाळा व्यवस्थापनाकडे या प्रकाराबाबात विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता, श्रीपाद दाभाडे या व्यवस्थापकाने पालकांना दमदाटी करत गुन्हे दाखल करण्याचा दम दिला. पोलिसांच्या वेशात ठेवण्यात आलेल्या दोन सुरक्षारक्षकांकडून मुलांना प्रतिनिधींशी बोलण्यास मज्जाव करण्यात आला. तर, व्यवस्थापनाची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता, बोलण्यास नकार दिला.

प्रशासनाचे वर्तन संशयास्पद
विद्यार्थ्यांचे पालक शाळेचे निलंबित कर्मचारी आहेत. या कर्मचाºयांनी सहावा वेतन आयोग लागू होण्यासाठी युनियन तयार केली होती. याचा राग आल्याने शाळा प्रशासनाने काही शिक्षकांसह कर्मचाºयांना निलंबित करून त्यांच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले असल्याचे पालकांनी सांगितले.

तीन दिवसांत फी भरण्याचे फर्मान
विद्यार्थ्यांना तीन दिवसांत प्रत्येकी 65 हजार रुपये फी भरण्याचे आदेश तीन दिवसांपूर्वी देण्यात आले होते. गुरुवारी शाळेने शहरातील आठ आणि चांदशी येथील शाळेतील तीन मुलांना अपमानास्पद वागणूक देत वर्गाबाहेर काढत कडाक्याच्या थंडीत बाहेर बसवले.

सुरक्षारक्षकांना पोलिसांचा वेश
शाळा व्यवस्थापनाने काही गुंडांचीच सुरक्षारक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. विद्यार्थी व पालकांवर कॅमेºयाद्वारे पाळतही ठेवली जाते. सुरक्षारक्षकांना पोलिसांचा गणवेश देण्यात आला आहे. ओळख लपवण्यसाठी हे कर्मचारी निळ्या रंगाचे जॅकेट परिधान करत असल्याने पालकांसह इतरांना ते खरे पोलिस कर्मचारी असल्याचा भासत होते. भिंतीलगतच असलेल्या पोलिस आयुक्तालयाच्या हा प्रकार लक्षात येत नाही, हे विशेष.
..म्हणून धरले वेठीस
सहावा वेतन आयोग लागू करावा, यासाठी शाळेत युनियन स्थापन करण्याची मागणी करण्यात आली होती. याचा राग आल्याने शाळा व्यवस्थापनाने एका कंत्राटी कर्मचारी महिलेकडून विनयभंग व छेडछाड करत असल्याचे खोटे गुन्हे युनियनच्या कर्मचार्‍यांवर दाखल केले. पालक चौकशी समितीकडे गेल्यास सुरक्षा कर्मचारी घेराव घालतात. दोन वेळा हल्ला करण्यात आला आहे.
-विजय मरसाळे, निलंबित शिक्षक आणि पालक

पाणीही दिले नाही
आम्हाला हाताला धरून वर्गाबाहेर हाकलून दिले. शाळेच्या आवारातून कुठे बाहेर गेला तर याद राखा, असा दम देत पाणीही दिले नाही. सकाळी 7 वाजेपासून बाहेर आहे. पालकांशी संपर्क साधण्यासाठी विनवणी करूनही संपर्क करू दिला नाही.
- एक विद्यार्थी