आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववीच्या वर्गातील मुलीने वाचवले शिक्षिकेचे प्राण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - व्यक्तिमत्त्व विकास विषयाच्या पेपरसाठी लगबगीने शाळेत निघालेल्या नववीच्या एका विद्यार्थिनीने समयसूचकता दाखवत आपल्या शिक्षिकेचे प्राण वाचवण्यात मोलाचा हातभार लावला.

आयुष्यातील व्यक्तिमत्त्व विकासाच्या परीक्षेत खर्‍या अर्थाने पैकीच्या पैकी गुण मिळविण्यात ती यशस्वी झाल्याचे म्हणावे लागेल.

सीडीओ मेरी शाळेतील विद्यार्थिनी उज्‍जवला सोनवणे सकाळी परीक्षा देण्यासाठी शिक्षिका मोहिनी तुरेकर यांच्यासोबत पायी जात होती. त्या वेळी अचानक तुरेकर यांना भोवळ आली.

घाबरलेल्या उज्‍जवलाने शिक्षिकेला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रतिसाद मिळत नव्हता. परंतु पेपरची पर्वा न करता लगेच धीर धरत या विद्यार्थिनीने अखेर आरडाओरड करत एका दूधवाल्याच्या मदतीने जवळच असलेल्या डॉ. प्रदीप जाधव यांच्या दवाखान्यात दाखल केले. तपासणीत तुरेकर यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर डॉ. जाधव यांनी या शिक्षिकेला तत्काळ रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णालयात दाखल केले.

या घटनेत पाच मिनिटे जरी उशीर झाला असता तर अघटित घडले असते. उज्ज्वलाने दाखवलेल्या या प्रसंगावधानामुळे तत्काळ उपचार मिळाल्याने शिक्षिकेचे प्राण वाचले, असे उपचार करणार्‍या डॉक्टरांनी सांगितले.