आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Student Security Issue At Nashik, Police Commitment

विद्यार्थी सुरक्षा: शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे; मुख्याध्यापकांचे आश्वासन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको (नाशिक)- विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सिडकोतील शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे आश्वासन मुख्याध्यापकांनी दिले, तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाईल, असे आश्वासन अंबड पोलिस ठाण्याचे निरीक्षक शांताराम अवसरे यांनी दिले. अंबड पोलिस ठाण्यात सोमवारी सिडको परिसरातील शाळांच्या मुख्याध्यापकांच्या बैठकीत ते बोलत होते.
सिडकोतील शाळकरी मुलीचे अपहरण झाल्यानंतर तीने प्रसंगावधान दाखवून आपली सुटका करून घेतली होती. याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार करण्यास पालक गेले असता त्यांनी तक्रार घेतली गेली नाही याबाबत ‘दिव्य मराठी’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर पोलिसांनी याची दखल घेतली. यानुसार अंबड, सिडको, कामटवाडे येथील सर्वच शाळांतील मुख्याध्यापक या बैठकीस उपस्थित होते. या वेळी मुख्याध्यापकांनी विचारलेल्या प्रश्नांना पोलिसांनी उत्तरे दिली. पोलिसांनीही सूचना केल्या, त्या अमलात आणण्याचे मुख्याध्यापकांनी आश्वासन दिले. या वेळी निरीक्षक अवसरे म्हणाले, यानंतरही अशा स्वरूपाच्या बैठकी आयोजित केल्या जातील. पोलिस, पालक व शिक्षक यांच्यातील संवादातून सामंजस्य राखले गेल्यास गुन्हेगारी रोखण्यास मदत होईल, यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रत्येक शाळेत नोंदवही राहील
शाळांमध्ये नोंदवही ठेवण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. या नोंदवहीत तक्रारी व सूचनांची नोंद राहील. शालेय वाहतूक करणार्‍या वाहनाची व त्याच्या चालकाची नोंद असेल. त्यात व्यक्तिगत माहिती, मोबाइल व वाहन क्रमांक याची माहिंती पालकांना मिळेल. तपासासाठी पोलिसांनाही यातून मदत मिळेल.
पोलिसांनी केलेल्या सूचना
> शाळेत शक्य असल्यास सीसीटीव्ही बसवावा.
> शाळेत सुरक्षारक्षक नेमावेत व त्यांना शाळेत तसेच शाळेच्या आवाराबाहेरही लक्ष देण्याची सूचना द्यावी.
> वाहने पार्किंग करण्याची व्यवस्था करावी व त्यावर शाळेचे नियंत्रण असावे.
> शालेय विद्यार्थी वाहतूक करणार्‍या खासगी वाहनांची माहिती ठेवावी.
> शाळेत पालक संघाची बैठक व्हावी.
> या बैठकीतील पालकांच्या सूचना लक्षात घ्याव्यात व त्यांनाही सूचना कराव्यात.
> शाळेत नोंदवही ठेवावी व त्यात माहिती, तक्रारी व सूचनांची नोंद केली जावी.
शाळेत सीसीटीव्ही बसविणार
सिडकोतील शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असल्याचे मुख्याध्यापकांनी या बैठकीत सांगितले. यासंदर्भात शाळेच्या संस्थाप्रमुखांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे. या उपक्रमामुळे शाळेतील व शाळेबाहेरील सर्वच गैरप्रकाराला आळा बसेल. विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या मनात सुरक्षिततेविषयी जागृती निर्माण होईल, असे त्यांनी म्हटले.
नाकेबंदी नावालाच
शहराच्या विविध ठिकाणी नाकेबंदी करण्यात येते; मात्र पोलिस कर्मचारी केवळ दुचाकी आणि बाहेरील गाड्यांना थांबवून अडवण्याचेच ‘कर्तव्य’ बजावत असल्याचा आक्षेप घेण्यात येत आहे. नाकेबंदीत अद्याप एकाही संशयितास अटक करण्यात आली नसल्याने नाकेबंदी नेमकी कशासाठी, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
मुख्याध्यापकांच्या सूचना
> शाळेस पोलिसांनी भेट द्यावी व विद्यार्थी-पालकांशी संवाद साधावा.
> शाळेच्या वेळात पेट्रोलिंग वाढवावे. यामुळे गुन्हेगारांवर वचक बसेल.
> शाळेच्या आवाराबाहेर उभ्या राहणार्‍या टवाळखोरांवर कारवाई करावी.
> शाळेच्या कार्यक्रमात पोलिसांचा सहभाग असावा. यामुळे विद्यार्थ्यांना पोलिसांबरोबर संवाद साधता येईल.
> पोलिसांनी शाळेतील पालकांच्याही तक्रारी लक्षात घ्याव्यात. यामुळे गुन्हेगारांची माहिती मिळेल.
> पोलिसांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. यामुळे विद्यार्थ्यांना पोलिसांबद्दल आदर निर्माण होईल.