आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुर्मी कायम: मुलगा जखमी तर झाला नाही ना? पोलिसांचा संतापजनक सवाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सिंधुसागर अकॅडमीच्या विद्यार्थ्याला मारहाण करणार्‍या पोलिस‘दादा’ विरोधात तक्रार करण्यासाठी गेलेल्या पालकाला सरकारवाडा पोलिसांनी ‘इतके कुठे मारले, तो जखमी-बिखमी तर झाला नाही ना?’ असा उलट सवाल करीत संबंधित कर्मचार्‍याच्या कृत्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला. या पालकाला तक्रार दाखल न करताच माघारी परतावे लागले.

सोमवारी दुपारी पंडित कॉलनीच्या रस्त्यावर संदीप यादव या विद्यार्थ्याच्या सायकलचा धक्का दुचाकीला लागल्याने सरकारवाडा पोलिस ठाण्याचे सहायक उपनिरीक्षक अशोक कोटकर यांनी त्याला मारहाण केली होती. ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने या घटनेचे छायाचित्र काढल्याचे लक्षात आल्याने ‘दादां’नी तेथून काढता पाय घेतला होता. घाबरलेल्या संदीपने सर्व हकीगत वडील चंद्रदेव यादव यांना सांगितल्यावर त्यांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापिका कमलेश चंदा यांना घटनेची माहिती दिली. नंतर ते सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी गेले असता, तेथील ‘साहेबां’नी मुलाला फार मारलेले नाही, असे ‘समजावून’ सांगितल्याने यादव माघारी फिरले.

सामान्यांनी पाहावे कुणाकडे?
एका विद्यार्थ्याचा चुकून धक्का लागला तर त्याला फार तर सायकल नीट चालवायला सांगणे अपेक्षित आहे. ‘विद्यार्थ्यांना मारू नका,’ असे सांगणार्‍या शासनाचेच प्रतिनिधी मुलांना मारायला लागले तर सामान्यांनी कुणाकडे पाहावे?
-कमलेश चंदा, मुख्याध्यापिका, सिंधुसागर अकॅडमी

‘दादां’ची मग्रुरी कायम
कोटकर यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना ‘मुलगा दुचाकीसमोर पडल्याने त्याला उचलून बाजूला करीत होतो. आपण त्याला वाचवण्याचाच प्रयत्न केला. मारहाण काही केली नाही,’ असा लेखी जबाब दिला.

दुर्दैवी आणि गंभीर
पोलिसाने विद्यार्थ्यास केलेल्या मारहाणीचा प्रकार दुर्दैवी व गंभीर आहे. यासंदर्भात संबंधित मुलगा व पालकांचेही म्हणणे ऐकून घेण्यात येईल.
-गणेश शिंदे, सहायक पोलिस आयुक्त