नाशिक - विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी, यासाठी शासन स्तरावर वेगवेगळ्या योजना राबविण्यात येतात. विद्यार्थिनींसाठी तर मोफत शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना अहिल्याबाई होळकर योजनेच्या माध्यमातून पाचवी ते दहावीपर्यंत राज्य परिवहन मंडळातर्फे मोफत प्रवास सुविधा आहे. मात्र, या चांगल्या कामांना हरताळ फासण्याचे काम राज्य परिवहन विभागाकडून होत असून, अनेक पास वितरण केंद्रांवर विद्यार्थ्यांची सर्रास लूट केली जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सातपूर परिसरातून दररोज हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी शहरात येत असतात. येथील विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास मिळण्यासाठी विभागातील अशोकनगर, शिवाजीनगर व सातपूर बसस्थानक येथे पास वितरण केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांवर पास वितरण करणार्या कर्मचार्यांकडून विद्यार्थ्यांची सर्रास लूट केली जात आहे. पास काढण्यासाठी आवश्यक असणारे ओळखपत्र पाच रुपयांना, तर त्यासाठी असलेल्या अर्जाचा नमुना दोन रुपयांना विक्री करणे आवश्यक आहे. मात्र, सातपूरच्या बसस्थानाकात यासाठी चक्क दहा रुपयांची आकारणी केली जात आहे. अर्जाच्या छापील नमुन्यावर असलेल्या दोन रुपये शुल्काच्या जागेवरच हे कर्मचारी सातपूर विभागाचा शिक्का मारून किंमत झाकण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली असून, याप्रश्नी कारवाई करण्याची मागणी केली आहे.
अन्यायकारक शुल्क
४जिल्ह्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी अर्जांची छपाई करण्यात आल्यामुळे परिवहन महामंडळाला 25 किंवा 50 पैसे प्रतिकॉपी पडली असेल. त्यामुळे तरीसुद्धा दहा रुपयांची आकारणी अन्यायकारक आहे.
- चंचल गावडे, विद्यार्थिनी