नाशिक - शिक्षण हक्क कायद्यांतर्गत २५ टक्के आरक्षणातील प्रवेशप्रक्रियेपासून वंचित राहिलेल्या शहरातील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी महापालिका शिक्षण मंडळ कार्यालयासमोर आंदोलन केले. आम्हाला शिक्षणाचा हक्क मिळालाच पाहिजे, प्रवेश नाकारणार्या शाळांवर कारवाई करा, शिक्षणहक्क कायद्याची अंमलबजावणी करा, अशी मागणी करत विद्यार्थी पालकांनी खासगी शाळांविरुद्ध घोषणाबाजी केली.
शिक्षणहक्क प्रवेशापासून वंचित राहिलेल्या ६२५ विद्यार्थ्यांसह पालकांनी गुरुवारी सकाळी ११ वाजता शिक्षण मंडळ कार्यालयासमोर आंदोलन केले. हातात फलक घेऊन विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत मुजोर शाळाचालकांविरुद्ध घोषणा दिल्या. वंचित विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन या वेळी पालक विद्यार्थ्यांनी शिक्षण मंडळ कार्यालयातील अधीक्षक चंद्रकांत थोरात यांना निवेदन दिले.
प्रवेशद्वारबंद केल्याने संताप : पंडितकॉलनी येथील शिक्षण मंडळ कार्यालयासमोर शांततेत आंदोलन केल्यानंतर विद्यार्थी पालक निवेदन देण्यासाठी कार्यालयात जात असताना सुरक्षारक्षकांनी प्रवेशद्वार बंद केले. यामुळे पालकांचा संताप अनावर झाला. अधिकार्यांविरुद्ध घोषणाबाजी केल्यानंतर काही वेळाने प्रवेशद्वार उघडण्यात आले.
एन्ट्रीलेव्हल बदलल्याने गोंधळ : २५टक्के प्रवेशप्रक्रियेअंतर्गत सुरुवातीला नर्सरी पहिली अशाप्रकारे दोन एन्ट्री लेव्हल ठेवल्या हाेत्या. ज्या शाळांमध्ये नर्सरी आहे त्यांनी नर्सरी, तर ज्या शाळांमध्ये पहिलीपासून वर्ग असल्यास त्यांना पहिलीला प्रवेश देणे बंधनकारक होते. त्यानुसार, प्रवेश प्रक्रियाही राबविण्यात आली. परंतु, ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शासनाने एन्ट्री लेव्हल इयत्ता पहिली ग्राह्य धरली जाणार असल्याचा निर्णय घेतल्याने नर्सरीसाठी प्रवेश घेतलेल्या ५००हून अधिक विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आता या शाळांचे हजारो रुपयांचे शुल्क कसे भरायचे, असा प्रश्न पालकांसमोर पडला आहे. पालकांच्या तक्रारी येत असल्याने त्यावर योग्य ते मार्गदर्शन करावे आतापर्यंतच्या प्रवेशप्रक्रियेची माहिती मंडळाने शिक्षण संचालनालयाकडे पाठविल्याची माहिती थोरात यांनी दिली.
अपात्र ठरविण्याचा फंडा
शाळांकडून प्रवेशासाठी आवश्यक शैक्षणिकविषयक कागदपत्रांमध्ये त्रुटी काढल्या जात असून, प्रवेश देण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे या शाळांवर कारवाई करण्यात यावी. शिवाजीबरके, पालक समिती संघटना
मंडळाचा वचक नाही
प्रवेश घेण्यासाठी गेल्यावर शाळांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जातात. इंग्रजी शाळांवर शिक्षण मंडळ विभागाचा वचक राहिल्याने शेकडो विद्यार्थ्यांच्या शिक्षणहक्कावरच गदा आली आहे. ज्योतीभावसार, पालक
शुल्क भरा.. नंतरच प्रवेश
ऑनलाइन अर्ज केल्यानंतर इंदिरानगर येथील शाळेत प्रवेश निश्चित झाला. नर्सरीसाठी प्रवेश घेण्यासाठी गेल्यावर शाळेकडून शुल्क भरा, नंतरच प्रवेश दिला जाईल, असे सांगण्यात आले. आर्या सकपाळ, विद्यार्थिनी