आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ युथ फेस्टिव्हलचे आता विद्यार्थ्यांना वेध...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महाविद्यालयांत दरवर्षी स्नेहसंमेलन होत नसले, तरी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्न महाविद्यालयांत आता युथ फेस्टिव्हलची जोरदार तयारी सुरू झाली आहे. महाविद्यालयांत विभागीय स्तरावर निवड चाचण्या पार पडल्यानंतर आता थेट मुख्य स्पर्धेसाठी सराव करण्यात विद्यार्थी रमलेले दिसत आहेत.

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचपीटी आर्ट‌्स आरवायके सायन्स महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांनी कसून सरावाला सुरुवात केली आहे. महाविद्यालय परिसरात कुठे तालीम सुरू झालेली दिसते, तर कुठे विद्यार्थ्यांनी वेळात वेळ काढून नवीन काहीतरी सादरीकरणासाठी सुरू असलेली धडपड पहायला मिळत आहे. ज्यामध्ये वेगवेगळे नृत्यप्रकारांचाही समावेश आहे. नुकत्याच झालेल्या निवड चाचणीमध्ये काही सोलो, तर काही ग्रुप डान्सची निवड करण्यात आली होती, त्याप्रमाणे हे सराव सुरू आहेत. पुणे विद्यापीठातर्फे डिसेंबरमध्ये घेण्यात येणाऱ्या युथ फेस्टिव्हलसाठी शहरातील विविध महाविद्यालयांतून विद्यार्थी सहभागी होणार आहेत. एकत्रित पहाता यामध्ये नृत्य, अभिनय, एकपात्री प्रयोग आणि इतर ललित कलांचा समावेश आहे. या सर्व स्पर्धांच्या विभागीय फेरीची निवड चाचणी दिनांक १६ सप्टेंबर रोजी पार पडली आहे. आता पुढील महिन्यात परीक्षांनंतर या स्पर्धेचा अंतिम टप्पा म्हणजेच विद्यापीठ युथ फेस्टिव्हल पार पडणार असल्याची माहिती विद्यापीठाकडून देण्यात आली आहे.

विविध स्पर्धांचा समावेश; एक प्रकार, एक संघ
सर्वकला प्रकारामध्ये प्रत्येक महाविद्यालयातून ठरावीक संख्येने विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले आहे. प्रत्येक कला प्रकारातील फक्त एक संघ एका महाविद्यालयातून सहभागी होऊ शकतो. यामध्ये संगीत, नृत्य, शैक्षणिक स्पर्धा जसे वादविवाद, चर्चासत्र आणि प्रश्नोत्तरे या स्पर्धा आहेत. शिवाय मिमिक्री, नाटिका, ऑन स्पॉट पेंटिंग, कोलाज, पोस्टर स्पर्धा, कार्टूनिंगसारख्या विविध स्पर्धा होणार आहेत.