आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुन्हा घडल्यास कॉन्ट्रॅक्टर बदलणार, विद्यार्थ्यांना जेवणात झुरळ, अळ्या अन‌् उंदीर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - उच्च शिक्षणाची आस घेऊन येणाऱ्या विद्यार्थ्यांना घरापासून लांब राहताना अनेक शैक्षणिक आणि वैयक्तिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे सर्वश्रुतच अाहे. असे असताना नामांकित शैक्षणिक संस्थांनी घेतलेल्या अवाजवी शुल्काविषयी सहज कानाडोळा करत जाब विचारण्याची वृत्तीही अंगभूत असते. एवढे शुल्क अाकारूनही अनेक शैक्षणिक संस्था पूर्णपणे सुविधा देण्यात अपयशीच ठरत असल्याची अनेक उदाहरणे अाहेत. त्यात कॅन्टीन सुविधेबाबतही बऱ्याच महाविद्यालयांत विद्यार्थ्यांची अाेरड अाहे.
नाशिकमधील नामांकित गोखले एज्युकेशन सोसायटीच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना खानावळीतील जेवणामुळे सातत्याने विषबाधा हाेण्याचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी अाहेत. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांसाठी तयार केल्या जाणाऱ्या स्वयंपाकात चक्क झुरळ, अळ्या अाणि अन्य घटक पडलेले असतानाही तसेच जेवण दिले जात असल्याच्या तक्रारी असल्याने विद्यार्थ्यांच्या अाराेग्याचा प्रश्न गंभीर बनला अाहे. याबाबत चाैकशी केली असता अनेक धक्कादायक बाबी ‘डी. बी. स्टार’च्या हाती लागल्या अाहेत. विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवणामुळे विषबाधा झाल्यावर महाविद्यालयीन प्रशासनाने बदनामी टाळण्यासाठी या प्रकारावर पडदा टाकण्याचा प्रकार केल्याचेही उघड झाले अाहे.

विद्यार्थ्यांच्या रात्रीच्या जेवणात चक्क उंदीर पडल्याने काही विद्यार्थिनींना विषबाधा झाली होती. हा घृणास्पद प्रकार लपवण्यासाठी दोन दिवस हवे त्या हॉटेलमध्ये खाण्याची मुभा देऊन संबंधित विद्यार्थ्यांचा सर्व खर्च महाविद्यालयाने उचलला. याबाबत पुराव्यांअभावी विद्यार्थी संस्थेशी अधिक बोलू शकले नाहीत. त्यामुळे हे प्रकरण दाबले गेले. यानंतर मात्र विद्यार्थ्यांना सातत्याने तोच प्रत्यय येऊ लागला. कधी जेवणात झुरळ, कधी अळ्या असे जेवण समोर येत असल्याने अखेर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी प्रशासनाला जाब विचारला असता, मुभा मागून घेत पुन्हा प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला गेला. तब्बल २५ हजार रुपये शुल्क आकारूनही एकवेळचे जेवणही व्यवस्थित मिळत नसल्यास कॉलेज फक्त नावापुरतेच मोठे आहे का? असा संतप्त प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला अाहे. अर्थात महाविद्यालय पातळीवर याकडे लक्ष नसले तरी प्रशासकीय पातळीवरही शून्य हालचाल असल्याने नवल वाटते.

अन्न अाैषध प्रशासनाचेही दुर्लक्षच
सार्वजनिक ठिकाणी हाेणारा भंडारा, महाप्रसाद, सार्वजनिक उत्सवातील जेवण यांवर लक्ष ठेवण्याबराेबरच हाॅटेल्स, मिठाईची दुकाने, खानावळी, कॅन्टीन अादींची नियमित तपासणी करण्याची जबाबदारी अन्न अाैषध प्रशासनाला पार पाडावी लागते. मात्र, अपुऱ्या मनुष्यबळामुळे प्रशासनाला ही जबाबदारी पार पाडणे शक्य हाेत नसल्याचे दिसून येते. नागरिकांच्या अाराेग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या तपासणीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अन्न अाैषध प्रशासनातील अधिकाऱ्यांमुळे विद्यार्थ्यांच्या अाराेग्याला धाेका निर्माण झाला अाहे.
महाविद्यालयीन कॅन्टीन, खानावळींमध्ये सातत्याने तपासणी करून स्वच्छता, अन्नपदार्थांचा दर्जा, दर्जेदार साहित्याचा वापर अादी बाबी तपासणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र तसे हाेत नसल्याने काही खानावळ, कॅन्टीनचालकांकडून केवळ उत्पन्नप्राप्तीवरच भर दिला जात असल्याचे दिसून येत अाहे. परिणामी, विद्यार्थ्यांच्या अनाराेग्याला अामंत्रण मिळत असून, ‘फूड पाॅइझनिंग’सारखे प्रकार वाढू लागले अाहेत. अाजार झाल्यावर उपचार करण्यापेक्षा अाजार हाेऊच नयेत, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. अन्न अाैषध विभागातील अधिकाऱ्यांनी तातडीने महाविद्यालयांतील खानावळ, कॅन्टीनच्या स्वच्छतेबाबत तपासणी माेहीम हाती घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली अाहे.

ही छायाचित्रेच सांगतात सर्व काही...
विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून त्या गांभीर्याने घेणाऱ्या महाविद्यालयीन प्रशासनाने निष्काळजीपणाचा कळसच गाठला. प्रशासनाविराेधात तक्रार केल्यास कारवाईची भीती असल्याने काही विद्यार्थी दबकलेही. मात्र, काही विद्यार्थ्यांनी धाडस करून तक्रार केली. मात्र, त्याची अद्यापही ठाेस दखल घेण्यात अालेली नाही. याबाबत विचारणा केली असता प्रशासनाने हा प्रकार घडला नसल्याचे सांगितले. परंतु, याच खानावळीतील जेवणात पडलेले हे उंदीर, झुरळ, अळ्या पाहता परिस्थितीचे गांभीर्य कळते.

कारवाईएेवजी १५ दिवसांची पुन्हा मागितली मुदत...
विद्यार्थ्यांशी या संदर्भात चर्चा केली असता त्यांनी महाविद्यालयांत नेहमी याबद्दल तक्रारी केल्या असल्याचे पुरावे दिले आहेत. शिवाय, तक्रारी केल्यानंतर ही गोष्ट पालकांना किंवा बाहेर कळाल्यास विद्यार्थ्यांना याबाबत मनस्ताप सहन करावा लागतो, हे विशेष. विद्यार्थ्यांना याबाबत चर्चा करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात येतात. पण, परिस्थितीला जबाबदार व्यक्तींवर ठाेस कारवाई केली जात नाही. या संदर्भात नेमके कोणाला भेटायचे, याची उत्तरेही मिळत नाहीत. प्राचार्य किंवा अन्य व्यवस्थापकांकडून उद्धट उत्तरे देऊन विषय टाळला जातो. या सगळ्या परिस्थितीवर नक्की कधी मार्ग निघणार, हेदेखील स्पष्ट होत नसल्याने हतबल विद्यार्थ्यांनी अखेर ‘डी. बी. स्टार’कडे अापल्या व्यथा मांडल्या. शेवटी महाविद्यालयाच्या प्रशासनाशी बोलून विद्यार्थ्यांनी विचारणा केली. यानंतर महाविद्यालयाने संबंधित विद्यार्थ्यांना १५ दिवसांची मुदत मागून घेत पुन्हा प्रकरण सोडवण्याची ग्वाही दिली आहे. महाविद्यालयांत सातत्याने येणाऱ्या या अडचणी सोडवण्यासाठी विविध यंत्रणा असूनही हा प्रश्न कायम असल्याने विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नाराजी व्यक्त केली अाहे. अाश्वासनांपेक्षा ठाेस कारवाईची अपेक्षा विद्यार्थी करीत अाहेत.

धक्कादायक परिस्थिती उघड...
विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर महाविद्यालयाच्या खानावळीत सतत हे प्रकार घडत असल्याचे सांगण्यात अाले. शिवाय, यापूर्वी जेवणात उंदीर पडलेला असल्याने मध्यरात्री काही विद्यार्थिनींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हे प्रकरण दाबण्यासाठी तिथून पुढे तीन दिवस महाविद्यालयाने विद्यार्थ्यांची हॉटेलची हजारो रुपयांची बिले भरल्याचेदेखील सांगण्यात आले. बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी अनेक विद्यार्थी या दिवसांत घरी निघून गेले, तर प्रकरण बाहेर येऊ नये म्हणून मुलांना मनमर्जी वागण्याची मुभादेखील महाविद्यालय प्रशासनाकडून देण्यात आली होती. याबाबत अनेक विद्यार्थिनींनी ‘डी. बी. स्टार’कडे अापबिती कथन केली.

..तर गंभीर अाजारांची शक्यता
^अन्नातून होणाऱ्या विषबाधेमुळे शरीरावर विपरीत परिणाम हाेऊ शकतात. अशा अाहारामुळे एखाद्या वेळेस जिवावरही बेतू शकते, याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. अन्नपदार्थांत जिवंत कीटक किंवा अळ्या पडल्याने त्यांच्या शरीरातील विष खाद्यपदार्थांत मिसळते. हे विषाणू पोटात गेल्यास जुलाब, उलट्या, ताप यांसारखे आजार उद‌्भवतात. विद्यार्थिदशेत याचा अधिक धाेका असताे. -डॉ. संजय वराडे, न्यूरॉलॉजिस्ट, सोपान हॉस्पिटल

विद्यार्थ्यांनी घाबरता तक्रारी कराव्यात
^यासंदर्भात चौकशी करून विद्यार्थ्यांच्या तक्रारी मागविल्या जातील. त्याबाबत तत्काळ कार्यवाही केली जाईल. मुख्य म्हणजे कॅन्टीनची स्वच्छता आणि तत्सम बाबींबद्दल अडचणी असल्यास त्याविषयी नियम आहेत. तपासण्यांमध्ये काही अाढळून आल्यास संस्था आणि कॅन्टीन कॉन्ट्रॅक्टर दोघांवर कार्यवाही केली जाईल. मुलांनी घाबरता तक्रार करणे गरजेचे आहे. -उदय वंजारी, सहआयुक्त, अन्न आणि औषध प्रशासन, नाशिक विभाग
बातम्या आणखी आहेत...