नाशिक-वडाळारोड येथील जुम्मा मशीद चॅरिटेबल ट्रस्ट संस्थेचे अध्यक्ष हाजी रऊफ पटेल यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या अफवेने बुधवारी दुपारी अचानक शेकडो विद्यार्थ्यांनी नागजी चौकात आंदोलन करत राजीनाम्याचा निषेध केला. या आंदोलनाची माहिती मिळताच पटेल यांनी विद्यार्थ्यांशी संपर्क साधून ही केवळ अफवा असल्याचे सांगितल्यानंतर आंदोलन संपले. व्हॉट्स अँपच्या माध्यमातून पसरलेल्या या अफवेमुळे वाहनधारकांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागला. एका विद्यार्थ्याच्या व्हॉट्स अँपवर दुपारी 3 वाजेच्या सुमारास राजीनाम्याचा संदेश आला. त्यानंतर काही वेळातच जुम्मा मशीद चॅरिटेबल ट्रस्ट संचलित जेएमसीटी पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी नागजी चौकातील मुस्लिम बँकेत धाव घेतली. त्यामुळे रस्ता काही काळ बंद झाला होता. अर्धा तास विद्यार्थ्यांनी पटेल यांनी राजीनामा परत घ्यावा, अशा घोषणा दिल्या.
दीड तास चालले आंदोलन
नागजी चौकात झालेले विद्यार्थ्यांचे आंदोलन तब्बल दीड तास चालले व पटेल आल्यानंतरच ते संपले. या ठिकाणी जमलेल्या काही युवकांमध्ये आपसात चकमकही झाली. एवढे होऊनही पोलिसांना मात्र याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नव्हती.