आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्गात ना मुलांना रागवायचं, ना छडी मारायची...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एका शिक्षकाने विद्यार्थ्याला शिस्त लावण्यासाठी त्याच्या हातावर वर्गातील सर्व मुलांच्या समोर छडी मारत शिक्षा केली. अाता हा प्रकार एवढ्यावरच थांबला का? तर नाही. त्या विद्यार्थ्याने घरी जाऊन ‘शिक्षकांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यापासून लपवून डोक्यात मारले,’ अशी तक्रार पालकांकडे केली. पूर्वी पालक खऱ्या प्रकाराची खातरजमा शाळेत येऊन करत; पण या अाधुनिक पालकाने शाळेत येऊन उलट मुख्याध्यापकांकडेच तक्रार केली... त्यांचे म्हणणे, ‘आमच्या पाल्यांना वर्गात उभे करायचे नाही, रागवायचे नाही, ना छडी मारायची. विद्यार्थ्यांना शिक्षा देण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला?’ विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याची जबाबदारी गुरू या नात्याने अापलीच असल्याचे मानणाऱ्या प्रामाणिक शिक्षकांची या बदलत्या परिस्थितीमुळे अध्यापन करताना मोठीच कोंडी होऊ लागली आहे.
शिक्षणहक्क कायदा आणि प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम यामुळे विद्यार्थी सहजरित्या पुढच्या वर्गात जाऊ लागल्याने गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम होऊ लागला आहे. गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांनी प्रयत्न केले तरीही त्याला पालकांकडून पाठबळ मिळेलच याची शाश्वतीही राहिलेली नाही. पालकांनी अपेक्षांचे ओझे नकळत आपल्या मुलांवर लादल्याचे चित्र पहावयास मिळत असून, त्यासाठी स्वत: कष्ट घेण्यास मात्र ते तयार नाहीत. आपल्या मुलाने सर्वाधिक गुण मिळवावे, अशी अपेक्षा कुणाही पालकाची असते. परंतु, त्यासाठी शिक्षकांनी मुलांना शिक्षाच करायची नाही असेही बहुतांश पालकांना वाटते. पूर्वी एखाद्या मुलाची शैक्षणिक प्रगती हाेत नसेल तर त्याचे पालकच शाळेत येऊन ‘याला चांगली शिक्षा करा अन‌् त्याच्यात सुधारणा करा,’ असे सांगायचे. मात्र, अाता पालकांची भूमिका बदलत असल्याने विद्यार्थ्यांना घडवताना शिक्षकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अनेक शिक्षक ‘अाता केवळ अध्यापन’ या भूमिकेप्रत अाले अाहेत.

आदरयुक्त भीतीही झाली कमी
आपल्या शिक्षकांविषयी प्रत्येक विद्यार्थ्याला आदर वाटत असतो. पूर्वी तर शिस्तप्रिय शिक्षकांसमोर जाण्यासही विद्यार्थी धजावत नव्हते. विद्यार्थ्यांना शिक्षकांविषयी वाटणारी ही आदरयुक्त भीती आता मात्र फारशी दिसून येत नाही. शिक्षक आपल्याला शिक्षा करू शकत नाही, याची खात्री विद्यार्थ्यांच्या मनात असल्याने शिक्षकांविषयीचा आदर कमी होऊ लागला आहे.

शिक्षेविना अध्यापन...
गृहपाठ केला नाही म्हणून शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षा करीत. त्यानंतर त्या विद्यार्थ्यांमध्येही सुधारणा होऊन ते अभ्यासाकडे लक्ष द्यायचे. आता मात्र विद्यार्थ्यांना कोणत्याही स्वरूपाची शिक्षा करता अध्यापन करण्याची जबाबदारी शिक्षकांवर आली आहे. शारीरिक, मानसिक शाब्दिक अशा कोणत्याही प्रकारची शिक्षा विद्यार्थ्यांना करता येत नाही. छडी मारणे तर केव्हाच बंद झाले आहे. ‘मानसिक’मध्ये पाच मिनिटे उभे करणे, रागावणे असे पूर्वी खूपच साैम्य मानले जाणारे प्रकार माेेडतात, तर ‘तू अभ्यासात मागे आहेस, कच्चा आहेस,’ असे एखाद्या विद्यार्थ्याला बोलणे ‘शाब्दिक’ त्रासात माेडते. या साऱ्या प्रकारांना पूर्णपणे मज्जाव करण्यात आला अाहे.
बातम्या आणखी आहेत...