आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला-बालकल्याण सदस्य सुरतकडे...निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईत ‘अभ्यास दौरा’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महिला व बालकल्याण समितीची निवडणूक तोंडावर आलेली असताना, तिची मोर्चेबांधणी करण्याऐवजी एखादा दौरा आटोपून घेण्याच्या उद्देशाने सभापतींसह पाच सदस्यांनी सुरत येथे अभ्यास दौरा काढला आहे. विशेष म्हणजे, समितीतील सर्वच सदस्य येत्या सोमवारी निवृत्त होत आहेत. त्यामुळे या अभ्यासाचा उपयोग नक्की कोठे केला जाईल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

स्थायी समितीत वर्णी लागण्यासाठी इच्छुक असलेले सदस्य महिला व बालकल्याण समितीसाठी नकारघंटा वाजवतात. या समितीत नियुक्ती झाल्यानंतर भविष्यात स्थायीच्या स्पर्धेत पत्ता कट होण्याची शक्यता असते. म्हणून संबंधित सदस्य महिला व बालकल्याण समितीपासून चार हात लांब राहणेच पसंत करतात.
येत्या सोमवारी या समितीची निवडणूक होणार आहे. गेल्या वर्षी मनसे व भाजपमध्ये रस्सीखेच झाली होती. त्यात भाजपने सभापतिपद मिळविले होते. यंदा मात्र निवडणुकीपूर्वी मनसे व भाजपचे सदस्य एकत्र येऊन सुरतला अभ्यास दौ-याला गेले आहेत. तेथील महापालिकेला भेट देऊन महिलांशी संबंधित योजनांची ते माहिती घेणार आहेत. समितीचा कार्यकाल पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर हा दौरा काढण्यात आल्याने त्याकडे साशंकतेनेच पाहिले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या आधीच हा दौरा होणार होता. परंतु, आचारसंहितेमुळे तो पुढे ढकलला गेला. विधानसभेच्या आगामी निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसांत लागण्याची शक्यता असल्याने दोन लाख रुपयांच्या आतील कामात या दौ-याचा समावेश करून तो आयुक्तांकडून घाईगर्दीत मंजूर करून घेण्यात आला व तितक्याच घाईत तो उरकण्यातही आला आहे.