आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sub Station Of Pune University In Nashik Slow Down

पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राचे काम बारगळले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - प्राध्यापकांच्या संपाचा फटका जसा विद्यार्थ्यांना बसला आहे तसाच नाशिक उपकेंद्राच्या कामालाही या संपाचा परिणाम सहन करावा लागत आहे. पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्राबाबत वरिष्ठ पातळीवरील सर्व हलचाली मंदावल्या आहेत.

पुणे विद्यापीठाचे नाशिक उपकेंद्र लवकरच सुरू करण्याविषयी विद्यार्थी संघटनांच्या पातळीवरून अनेक दिवसांपासून पाठपुरावा केला जात होता. त्यानुसार सुमारे दोन महिन्यांपूर्वी कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, बीसीयूडी संचालक डॉ. व्ही. बी. गायकवाड यांनी नाशिकमधील विभागीय केंद्रास दिलेल्या प्रत्यक्ष भेटीत विविध विद्यार्थी संघटनांच्या प्रमुखांसमोर उपकेंद्राचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनानंतर नाशिकमध्ये उपकेंद्रासाठी जागाही निवडण्यात आली होती.

वरिष्ठ पातळीवरून अत्यंत वेगाने होणार्‍या हलचालींमुळे नाशिकमधील विद्यार्थ्यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. त्याचबरोबर पुणे विद्यापीठाशी समान असे इन्फ्रास्ट्रक्चर नाशिकमध्ये उभारण्याचा मानसही कुलगुरूंनी व्यक्त केल्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या सकारात्मक बदल लवकरच येथे घडेल असे वाटू लागले होते. मात्र, प्राध्यापकांच्या संपामुळे महाराष्ट्रभर उमटलेल्या पडसादामध्येच या उपकेंद्राच्या कामाबाबतही एक प्रकारची उदासीनता आली. एकापाठोपाठ एक होणार्‍या हालचाली आपोआपच मंदावत गेल्या व आता पुन्हा उपकेंद्राबाबत कोणताही विचार वरिष्ठ पातळीवर होणे थांबले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

एवढेच नव्हे तर उपकेंद्रासाठी निवडलेल्या जागेचा प्रश्न सुटत नसल्याने त्याऐवजी अन्य जागेचा शोध लवकरात लवकर घेण्याचेही कोणतेही प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून होत असल्याचे चिन्हही दिसत नाही. त्यामुळेच नाशिककर विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा उपकेंद्राच्या मागणीसाठी झगडावे लागते का, असे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.