नाशिक- सिंहस्थकुंभमेळ्याच्या अनुषंगाने महावितरणच्या उपकेंद्रासाठी महापालिकेने 3000 चौरस मीटर जागा देण्याच्या प्रस्तावावर शनिवारी झालेल्या महासभेत गरमागरम चर्चा झाली. त्यात ‘गिव्ह अॅण्ड टेक’ धोरण अधोरेखित करीत 3000 चौरस मीटर जागेच्या बदल्यात पंचवटीतील उपकेंद्राची जागा महावितरणने महापालिकेला द्यावी असा ठराव करण्यात आला. यापूर्वी केलेली कब्जा पावती तातडीने रद्द करण्याचे आदेशही महापौर अशोक मुर्तडक यांनी प्रशासनाला दिले.
महापालिकेच्या ताब्यातील तपोवनातील सर्व्हे क्रमांक 328 329 मधील 2000 चौरस मीटर, तसेच गणेशवाडी येथील 331 मधील 1000 चौरस मीटर जागा महावितरण कंपनीस विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव महासभेवर शनिवारी सादर करण्यात आला. हा प्रस्ताव यापूर्वी स्थायी समितीने फेटाळल्यानंतर तत्कालीन राज्य शासनाने हस्तक्षेप करीत स्थायीचा निर्णय विखंडित केला. त्या अनुषंगाने महासभेत झालेल्या चर्चेत सदस्यांनी महावितरणास जागा देण्यास विरोध दर्शविला. जागेसंदर्भात महासभेत कोणताही निर्णय झालेला नसताना प्रशासनाने परस्पर महावितरणला कब्जा पावती दिल्याचा धक्कादायक प्रकारही महासभेत उघड झाला. या वेळी आयुक्त सोनाली पोक्षे यांनी खुलासा करीत, महासभा जो निर्णय देईल तो अंतिम राहील, असा निर्वाळा दिला. स्थायी समितीचा निर्णय बदलण्याचा अधिकार शासनाला दिला कोणी? असा प्रश्नही सदस्यांनी उपस्थित केला. सुधाकर बडगुजर, संदीप लेनघर, उद्धव निमसे, अॅड. यतीन वाघ, संजय चव्हाण, दिनकर पाटील, उत्तम कांबळे, सलीम शेख, प्रकाश लोढें, दामोधर मानकर, शाहू खैरे, शिवाजी गांगुर्डे, सचिन महाजन, कविता कर्डक, अॅड. तानाजी जायभावे, अश्विनी बाेरस्ते, अशाेक सातभाई, उषा शेळके, सूर्यकांत लवटे अादींनी चर्चेत सहभाग घेतला.
उपमहापौरांनी सोडले पीठासन
आपलेमत स्पष्टपणे मांडण्यात प्रसिद्ध असलेले उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी शनिवारी झालेल्या महासभेत पीठासनावरून खाली उतरून अापले विचार मांडले. यापूर्वी प्रा. देवयानी फरांदे या उपमहापौर असताना पीठासनावरून खाली उतरून भाषण करीत. दरम्यान, महासभेत नवनिर्वाचित आमदार बाळासाहेब सानप प्रा. देवयानी फरांदे यांचा सत्कार करण्यात आला.
संजयचव्हाण यांना गटनेतेपद
अपक्षआघाडीच्या गटनेतेपदी संजय चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. सभागृहनेतेपदासाठी कुठल्याही एका पक्षाचे गटनेतेपद असणे आवश्यक असल्याने चव्हाण यांची या पदावर नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा आहे. येत्या मंगळवारी स्थायी समिती, प्रभाग समित्या, सभागृहनेतेपद यासाठी सत्ताधाऱ्यांमध्ये करार हाेणार अाहे. त्यानंतर चव्हाण यांची सभागृहनेतेपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.