नाशिक- कळवणच्या आदिवासी तरुणांनी पूर्वी केवळ चित्रांमध्ये विमान पाहिले होते. परंतु हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने त्यांना लढाऊ विमान निर्मिती प्रकल्पात सहभागी होण्याची संधी दिली. ‘ऑन जॉब ट्रेनिंग’ (ओजेटी) अंतर्गत कळवण आयटीआयचे ९० प्रशिक्षणार्थी नाशिकजवळील ओझर येथे प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेत आहेत. कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या वतीने एस.आर. सूर्यवंशी आणि उपसंचालक योगेश पाटील यांनी एचएएल प्रशासनासोबत करार केला होता. या कराराला कृतीत आणण्यासाठी कळवण आयटीआयचे गटनिर्देशक प्रशांत बडगुजर यांनी विशेष मेहनत घेतली. प्रशिक्षणार्थी सध्या एचएएलमध्ये सीएनसी मशीन ऑपरेटिंग, विमानाच्या पंखांचे रिव्हेटिंग, वायरिंग आदी कामे कुशलतेने करत आहेत.
रोजगार मिळणार : कामानंतर प्रशिक्षणार्थींना एचएएलचे प्रमाणपत्र मिळेल. त्याआधारे प्रशिक्षणार्थी देशात कुठेही रोजगारास पात्र ठरतील. विद्यार्थ्यांच्या कौशल्य व व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल दिसत आहेत. बडगुजर, प्राचार्य सुभाष कदम यांनी मेहनत घेतल्याचे विद्यार्थी सांगतात.