आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कारखान्यात काम करणारी महिला झाली उद्याेजिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- एका कारखान्यात काम करणाऱ्या युवतीच्या मनात ‘स्वत:चा छोटासा कारखाना असावा’ असा विचार आला आणि त्या दिशेने सुरुवात झाली. त्यात सासऱ्यांनी देखील मदत केली आणि २००७ मध्ये सिन्नर औद्योगिक वसाहतीत भाडेतत्त्वावर पॅकेजिंग इंडस्ट्रीज सुरू झाली. मूळ बिहारची, बारावीपर्यंत शिक्षण गुजरातमध्ये, लग्नानंतर नाशिकला आलेल्या आणि घरकाम सांभाळून पुढे कोटीच्या कोटी उड्डाणे घेत या महिलेने उद्याेगवश्वात भरारी घेतली.
विज्ञान शाखेत बारावी करत असताना अर्चनाचा विवाह गाेविंद झा यांच्याशी २००४ मध्ये झाला. लग्नानंतर पतीसोबत नाशिकला आलेली अर्चना सुरुवातीला गृहिणीच होती. पुढे मेक इंजिनिअर्स या कारखान्यात २००७ पर्यंत काम केल्यावर ‘स्वत:चा कारखाना असावा’ असा विचार त्यांच्या मनात आला. पती गाेविंद सासरे गाैरीशंकर यांनी त्यांच्या स्वप्नाला पाठबळ दिले. सिन्नर एमआयडीसीत भाडेतत्त्वावर जागा शोधल्यावर अर्चनानेच कारखान्याचे नाव ‘जीएस इंडस्ट्रीज्’ असे सुचवले.
बिसलरी कंपनी ठेक्यापासून उभारी
जिल्ह्यातील बिसलरी कंपनीशी सर्वप्रथम यशस्वी करार झाल्यानंतर आशा पल्लवीत झाल्या. दर्जेदार गुणवत्तेचा माल पुरविल्याने कंपनीचे नाव औद्योगिक विश्वात चर्चेत आले. सध्या ऑनलाइन टेंडरमुळे सीमेन्सच्या मुंबई, नाशिक गोवा या तिन्ही ठिकाणचा तीन वर्षांसाठी करार केला आहे. सध्या दरमहिन्याला ३० ते ४० लाख, तर वर्षाला तीन ते चार कोटी रुपयांची उलाढाल सुरू आहे. या तिन्ही कंपन्यांना माल पुरविण्यासाठी सिन्नरचा कारखाना २४ तास सुरू आहे.
बँकेने दिली मोलाची साथ
व्यवसाय वाढल्याने भांडवल कमी पडू लागले. मात्र बँक ऑफ महाराष्ट्रने अपेक्षित कर्ज दिल्यानेच व्यवसाय वाढू शकला. बँकेला बँक नव्हे, तर माझा पार्टनरच समजते, असे अर्चना सांगतात.
परिस्थितीशी झुंज कायम ठेवली
सुरुवातीच्या काळात काम मिळविण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. कधी काळी निर्णय चुकल्यासारखा वाटला, पण जिद्द कायम होती. २००९ ते २०११ अतिशय मेहनत घेऊन कारखाना सुरूच ठेवला. कामगार म्हणून महिलांना प्राधान्य दिले. गुणवत्तेचे निकष कायम ठेवल्याने व्यवसाय वाढू लागल्याचे त्यांनी सांगितले.