आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक ग्रॅम हिमोग्लोबिन, तरीही ‘बिटकाे’मध्ये सुखरूप प्रसूती, अवघड शस्त्रक्रिया करण्यात यश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - गर्भार महिलेच्या रक्तामध्ये केवळ एक ग्रॅम हिमोग्लोबिन असताना बिटको रुग्णालयातील डाॅक्टरांनी या महिलेची यशस्वीपणे नैसर्गिक प्रसूती करून या महिलेला अाणि तिच्या कन्येला जीवदान दिले. या घटनेमुळे बिटको रुग्णालयात मंगळवारी आनंदाचे वातावरण होते. 
 
गरोदरपणातील दिवस पूर्ण झाल्याने संसरी येथील ज्योती सुनील परदेशी यांना प्रसूतीसाठी देवळाली कॅम्प येथील कॅन्टाेन्मेंट रुग्णालयात दाखल केले. मात्र, रक्तामध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण खूपच कमी असल्याने रुग्णालयाने त्यांना दाखल करून घेण्यास नकार दिला. त्यानंतर खासगी रुग्णालयाकडूनही दाखल करून घेण्यास नकार मिळाल्याने शेवटचा पर्याय म्हणून महापालिकेच्या नाशिकराेड येथील बिटको रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. मात्र, तोपर्यंत मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. त्यामुळे परिस्थिती धोकादायक बनली होती. 
 
नाशिकरोड येथील बिटको रुग्णालयात दाखल करताच डाॅक्टरांनी परिस्थिती लक्षात घेत त्वरित प्रसूतीचा निर्णय घेतला. तोपर्यंत दोन बाटली रक्त आणि रक्तातील लालपेशी अाणण्यात अाल्या. यावेळी डाॅ. स्वप्नील राऊत आणि डाॅ. प्रज्ञा पाटील यांनी ज्योती परदेशी यांच्यावर उपचार सुरू करून त्यांची प्रसूती केली. ज्योती परदेशी यांनी कन्येला जन्म दिला. त्यानंतर डाॅ. सदानंद नाईक यांनी रक्त आणि लाल पेशी उपलब्ध करून रुग्णाला दिल्या. त्यामुळे आता बाळंतीण आणि तिची कन्या दोघेही सुखरूप आहेत. 
 
यावेळी डाॅ. दिलीप गरुड, डाॅ. शिल्पा काळे, स्वाती देवरे, रोहिता कुबरेजा, विद्युल्लता जाधव जगदीश पवार हे उपस्थित होते. 
 
अवघड शस्त्रक्रिया करण्यात यश 
महापालिकेचे रुग्णालय असल्याने बिटकाे रुग्णालयाकडे नागरिकांचा बघण्याचा दृष्टिकाेन चांगला नाही. मात्र, बिटको रुग्णालयात अवघड शस्त्रक्रिया आणि प्रसूती करण्यात येथील डाॅक्टर यशस्वी झाले आहे. मंगळवारी अवघड प्रसूती करून बाळंतीण आणि तिची कन्या सुखरूप असल्याने बिटको रुग्णालयामध्ये आनंदाचे वातावरण आहे.
- डाॅ. जयंत फुलकर, वैद्यकीय अधिकारी 

यशस्वी प्रसूतीमुळे अानंदित 
सकाळी माझी पत्नी ज्योती हिची तब्येत अतिशय गंभीर झाली होती. मात्र, महापालिकेच्या बिटको रुग्णालयातील डाॅक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांनी यशस्वी प्रसूती केल्याने खूपच आनंदित आहे. बाळ बाळंतीण सुखरूप अाहेत.
-सुनील परदेशी, पती 
बातम्या आणखी आहेत...